Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

पुलावरून कार खड्ड्यात कोसळली; चार जण जखमी

माजलगाव - खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात पुलाचे कठडे तोडून कार खाली खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ  जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बीड-परळी महामार्गावर माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड नजीक घडला. 


बीड- परळी हायवे वरील दिंद्रुड नजदीक भर रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून एक खड्डा येजा करणाऱ्यांना गंभीर अपघातांचे कारण बनला आहे. जवळपास १२ अपघात गेल्या दोन महिन्यात या खड्ड्यामुळे झाले आहेत. मंगळवारी परभणीच्या पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथील  कल्याण घाडगे, प्रल्हाद भुमरे, शिवाजी वडमारे व अन्य एक जण धारूर तालुक्यातील देवदहिफळ येथे नवस फेडण्यासाठी आले होते. सायंकाळी स्वगावी परतत असताना खड्डा चुकवण्याच्या नादात कार पुलाला धडकून पुलाखाली जाऊन पडली. कारने तीन ते चार पलटी मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दिंद्रुड पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार बालाजी सूरेवाड, रेवन दुधाने व वाहन चालक युनूस शेख यांनी सतर्कता दाखवत रुग्णवाहिका लवकर येत नसल्याचे पाहून गंभीर जखमींना पोलीस वाहनात पात्रुड येथील शासकीय रुग्णालयात हलवले.

गेल्या दोन वर्षांपासून बीड परळी महामार्गावरील दिंद्रुड नजदीक असलेला खड्डा अनेकांना मृत्यूचे दार उघडवत आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा याबाबत माहिती देऊन होत असलेले दुर्लक्ष संताप जनक असल्याची प्रतिक्रिया संगम येथील माजी उपसरपंच बळीराम डापकर यांनी दिली.

Tuesday 14th of May 2024 07:34 PM

Advertisement

Advertisement