८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
पुणे - नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) रविवारी (दि. १९) अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच, राज्यातील अवकाळी पाऊस १९ नंतर ओसरेल, असाही अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे.
दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहेत. दरवर्षी मान्सून अंदमानात १९ मेच्या आसपास दाखल झालेला पाहायला मिळतो. दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह आणि पावसाच्या हजेरीने मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात येते. पुढील दोन ते तीन दिवसांत अंदमान निकोबार बेट समूह आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून प्रगती करण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मान्सून साधारणतः २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. यंदा मान्सून रविवारी (दि. १९) अंदमानात दाखल होणार आहे.