Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार

केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं चित्र आहे. अशोक चव्हाण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अमित शाह हे 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यावेळी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ट्विटरच्या माध्यामातून ही माहिती दिली. तसेच भोकर विधानसभेच्या आमदारकीचाही त्यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवल्याचं सांगितलं. 

गेल्या आठवड्यात अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी राजीनामा देण्याविषयी चर्चा झाली. त्यानंतर आता अशोक चव्हाणांनी आपला राजीनामा दिला आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत आपला पक्षप्रवेश व्हावा अशी इच्छा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी रोजी अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. 

राज्यात मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांना केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना राज्यसभेवर घेतलं जाणार असल्याची चर्चाही आहे. त्याचमुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाल्याचं दिसतंय. त्यांच्यासोबत काही आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. विधानपरिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. त्याचवेळी मुंबई काँग्रेसमध्येही अस्वस्थता असल्याचं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चाही होतेय. 

Monday 12th of February 2024 02:30 PM

Advertisement

Advertisement