अंबाजोगाईत गावठी पिस्टल कमरेला लावून फिरणारा तरुण जेरबंद
अंबाजोगाई - अंबाजोगाई शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत कमरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या एकास पाठलाग करून बेड्या ठोकल्या. यावेळी त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. ही थरारक कारवाई शहरातील राजीव गांधी चौकात गुरुवारी (दि.२१) करण्यात आली.
सध्या गणपती उत्सव व ईद या सनाच्या अनुषंगाने बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर अधीक्षक कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले उपविभाग अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शह ठाण्याचे पोलीस निरिक्षक विनोद घोळवे यांनी कंबर कसली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख बंदोबस्त ठेवल्या असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबऱ्यांची देखील मदत घेण्यात येत आहे. दरम्यान, राजीव गांधी चौक येथे तीन तरुण गावठी पिस्टल कमरेला लावून फिरत आहेत अशी माहिती पीआय घोळवे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारला असता ते तीन तरुण पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्या तिघांपैकी वैभव अनंत घुले (वय २०, रा. टाकळी ता. केज) यास जेरबंद केले. मात्र, इतर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी वैभव घुले याच्याकडून गावठी पिस्टल आणि दुचाकी असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरिक्षक विनोद घोळवे, पोलीस उपनिरीक्षक चाँद मेंडके, पोलीस कर्मचारी घोळवे, गायकवाड, वडकर, नागरगोजे, चादर, लाड, काळे यांनी केली.