दुष्काळाचे सावट दुर होवू दे, बाप्पांकडे भक्तांचे साकडे
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- यंदाही गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. एकाबाजूला गणरायाच्या आगमनाचा उत्साह तर दुसर्या बाजूला दुष्काळाचे सावट अशी अनेकांची मनोवस्था झाली आहे. विघ्नहर्ता म्हणून गणरायाकडे पाहणार्या भाविकांनी पुरेसा पाऊस पडावा यासाठी बाप्पासमोर हात जोडून आर्त हाक दिली आहे.
अंबाजोगाई शहर व तालुक्यात गणरायाची प्रतिष्ठापना भक्तिभावाने करण्यात आली. तरुण गणेशोत्सव मंडळे व भाविक आता गणपती आरास व देखावे यात मग्न झाले आहेत. मात्र, त्यांचे पाऊस कधी येईल म्हणून वरती आकाशाकडेही लक्ष आहे. राज्याच्या अनेक भागात मध्यंतरी पावसाने हजेरी लावली असली तरी ती पुरेशा स्वरूपाची नव्हती. जिल्ह्यात धरणात पुरेसे पाणी असेल तरच अंबाजोगाईकरांना सुरळीत पाणीपुरवठा होतो. तालुक्यातील तलाव अपेक्षितपणे भरलेले नाहीत, शिवाय धरणातही आणखी पाण्याची आवश्यकता आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता सोडविला हे खरे असले तरी अनेक पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न या पावसाने पूर्णपणे सुटलेला नाही. खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, तूर, गुम ही पिके वाया गेली आहेत. येणार्या काळात रब्बी हंगामासाठी तरी किमान पावसाची गरज आहे. पावसाने पाठ फिरविली की दुष्काळाचे संकट उभा राहते. अंबाजोगाई तालुक्यात सध्या पावसाअभावी असेच दुष्काळाचे सावट जाणवत आहे. विघ्नहर्ता म्हणून गणरायाकडे पाहिले जाते. दुष्काळाचे विघ्न येऊ देऊ नको, पाऊस पडू दे, अशी आर्त हाक भाविक देत आहेत. अंबाजोगाई तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पावसाचे प्रमाण पाहिले तर अत्यंत कमी प्रमाणात आहे. खरीप पिके वाया गेली आहेत. एवढ्या मर्यादित प्रमाणात हा पाऊस झाला आहे. या आठ-पंधरा दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्यास शेतकर्यांना व सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे, म्हणूनच पावसाची प्रार्थना करत भाविक गणरायासमोर रोजच उभा राहत आहेत.