आकडा काढून घे म्हणाल्यावरून लाईनमनला मारहाण
केज - विद्युत तारेवर टाकलेला आकडा काढण्यास सांगितल्यावरून कर्तव्यावर असलेल्या लाईनमनला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना आडस ( ता. केज ) येथे घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध धारुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
आडस ( ता. केज ) येथील कनिष्ठ अभियंता कार्यालय महावितरण कंपनीचे कनिष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन हनुमंत काळे यांना गावातील माणिक साहेबराव वाघमारे याने विद्युत तारेवर आकडा टाकल्याचा दिसून आला. सोमवारी लाईनमन सुदर्शन काळे यांनी संबंधित व्यक्तीला आकडा काढून घ्या म्हणून विनंती केली. या कारणावरून दोघांमध्ये भांडण लागले. यामध्ये काळे यांना चापट मारून त्यांच्या गणवेशाचा खिसा फाडून जिवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार सुदर्शन काळे यांनी दिल्यावरून माणिक वाघमारे याच्या विरोधात धारूर पोलिसात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे हे तपास करताहेत.