Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अंबाजोगाई तालुक्यात सर्वदूर पाऊस

अंबाजोगाई (प्रतिनिधी) - गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा चिंतातूर होता. तालुक्यातील काही ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात खरिपाच्या पेरणी झाल्या. मात्र, पाठ फिरवलेल्या पावसाने आर्द्रा नक्षत्राच्या पूर्वसंध्येला तालुक्यात बर्‍यापैकी हजेरी लावली.
अंबाजोगाई तालुक्यात अल्प प्रमाणात खरिपाच्या पेरणी झालेल्या आहेत. मंगळवारी सकाळपासून उकाडा सुरूच होता. दुपारच्या सुमारास सुमारे तासभर पाऊस बरसल्याने अंगाची लाहीलाही कमी झालेली आहे. तर कित्येक दिवस शेतकरी पावसाची वाट पाहात होते. अखेर अंबाजोगाई तालुक्यात काही ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावल्याने उर्वरित शेतकरी लवकरच पेरणीस प्रारंभ करतील. खरिपाच्या पेरणीसाठी पुरेसा मान्सून बरसावा म्हणून अगदी चातकासारखी वाट पाहात असलेल्या शेतकर्‍यांना पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून पेरणीपूर्वी मशागत करून तयार केलेल्या शेतात खरिपाच्या पेरणीसाठी हा आर्द्रा नक्षत्राचा पाऊस उपयुक्त समजला जात आहे. मान्सून पूर्व व मान्सूनच्या पावसाने अंबाजोगाई तालुक्यात पुस, घाटनांदुर, पिंपळा धायगुडा, चनई, मोरेवाडी, चतुरवाडी, सोमनाथ बोरगाव, शेपवाडी, कुंबेफळ, होळ, राडी परिसरातील गावांमध्ये तर काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली. सध्या शेतकरी मोठा पाऊस पडावा म्हणून मोठ्या आशेने आकाशाकडे डोळे लावून बसले होते. आकाशात अधूनमधून काळेकुट्ट ढग जमा होत होते. परंतु पाऊस मात्र हुलकावणी देत होता. तालुक्यात बर्‍यापैकी हजेरी लावल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

Wednesday 22nd of June 2022 11:01 AM

Advertisement

Advertisement