Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

पंकजा मुंडेंच्या स्वागतासाठी पाथर्डीत जनसागर लोटला

आपलं प्रेम, आशीर्वाद हिच माझ्यासाठी मोठी संपत्ती - पंकजाताईंनी व्यक्त केल्या भावना

पाथर्डी  -फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा निनाद, जेसीबीतून फुलांची उधळण आणि कार्यकर्त्यांचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे आज शहरात जोरदार स्वागत झाले, यासाठी मोठा जनसागर लोटला होता. नगर-मोहटादेवी रस्त्यावर गावागावांत त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते एकवटल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
   पंकजाताई मुंडे हया श्रीक्षेत्र मोहटादेवीचे दर्शन घेण्यासाठी अहमदनगर जिल्हयाच्या दौर्‍यावर आल्या होत्या. नगर शहरातील स्नेहालय संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास हजेरी लावून त्या मोहटादेवी मंदिराकडे मार्गस्थ झाल्या. रस्त्यात ठिक ठिकाणी त्यांचे मोठे स्वागत झाले.
आपले प्रेम, आशीर्वाद हेच माझ्यासाठी मोठं
मेहेकरी, पाथर्डी येथे कार्यकर्त्यांसमोर बोलतांना पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, मी माझ्या मतदारसंघातून जात असताना या भागातून गेले आणि मोहटादेवीचं दर्शन घेतलं नाही असं कधी झालं नाही.काल रात्री नगरमध्ये आल्यावरच लोकांनी सांगितलं की आम्ही जागोजागी तुमचा सत्कार करणार आहोत त्यामुळे तुम्हाला मोहटादेवीला जायला चार पाच तास उशीर होईल. माझा बीड जिल्हयात कार्यक्रम असल्याने तिकडचे लोक पण जीव मुठीत धरून बसलेत. मी असं काय केलं की तुम्ही माझं एवढं स्वागत करत आहात, तसं कारणही नाही. मी फक्त दर्शनाला आलेयं. आपण केलेल्या स्वागताने भारावून गेले,  ही सर्व मुंडे साहेबांची पुण्याई आहे, तुमचं निष्पाप प्रेम आहे, हे माझं भाग्य आहे. इथून फक्त जाण्याने माझं एवढं स्वागत करता, एवढं प्रेम करता, याने मला जी शक्ती मिळते ती मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ती शक्ती लढण्याची शक्तीयं, ती स्वाभिमानाची शक्ती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात    आपल्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी मी सदैव उत्सुक आहे. आपले आशीर्वाद हिच माझेसाठी मोठी संपत्ती आहे. अजून काय पाहिजे?  तुमचं हे प्रेम, ऋणानुबंध असंच कायम ठेवावे. लोकनेते मुंडे साहेबांनी दिलेला वसा आणि वारसा असाच पुढे चालवायचाय, त्यासाठी शक्ती द्या असं पंकजाताई म्हणाल्या.
गर्दी आणि जंगी स्वागत; जेसीबीतून फुलांची उधळण
पंकजाताई मुंडे आणि प्रचंड गर्दी हे समीकरण इथेही दिसून आले. नगरहून मोहटादेवीकडे जातानामेहेकरी, करंजी, देवराई, बाभुळगाव, पाथर्डी, कोरगांव, मोहटा, चिंचपूर, पांढरवाडी फाटा आदी ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. जेसीबीतून फुलांची उधळण करत उघडया जीपमधून त्यांची मिरवणूक काढली. देवराई येथे अजय पालवे या कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्याच्या आई व कुटुंबाला धीर दिला. अजय आता परत येणार नाही, परंतु त्याला न्याय मिळवून देऊ, असं त्या म्हणाल्या. खा. सुजय विखे, आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे आदींसह जिल्हयातील नेतेमंडळी यावेळी उपस्थित होती.भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष  गोकुळ दौंड यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन त्यांनी या दौऱ्यात केले.

Tuesday 21st of June 2022 06:40 PM

Advertisement

Advertisement