स्वच्छता ही देवाच्या रुपासारखी आहे. स्वच्छता ही जीवनात अत्यंत आवश्यक - जिल्हाधिकारी
शहरातून जमा केला 4 टन 500 किलो ओला कचरा व 114 टन 300 किलो सुका कचरा
बीड - स्वच्छता ही देवाच्या रुपासारखी आहे. स्वच्छता ही जीवनात अत्यंत आवश्यक आहे. परिसर स्वच्छ नसने हे आजार पसरण्याचे मुख्य कारण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले. यावेळी सर्वप्रथम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडाच्या सर्व सदस्यांचे बीड शहरामधील 25 कार्यालये, 3 स्मशानभूमी व 2 कब्रस्तान येथे स्वच्छता केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार मानले.
यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला. प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसिलदार सुहास हजारे, प्रतिष्ठानचे बीड समिती प्रमुख सिध्देश्वर आर्सुळ, शासकीय कार्यालय प्रमुख व कर्मचारी तसेच प्रतिष्ठानचे विविध जिल्ह्यातून आलेले 1 हजार 432 सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, मी स्वत: स्वच्छता प्रेमी असून मी आमच्या अधिकारी कर्मचारी यांना वारंवार स्वच्छतेबद्दल नेहमी सूचना देत असतो. आमच्या विभागाचे आयुक्त श्री. सुनील केंद्रेकर यांचा स्वच्छता हा आवडता विषय असून त्यांनी विभागामध्ये माझे कार्यालय सुदंर कार्यालय ही मोहिम राबविली. त्यांची दखल घेऊन राज्य शासनाने शासन निर्णय काढून ही मोहिम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला.
बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छतेसाठी पावसाळ्यापूर्वी आणखी एक मोहिम राबविण्याची व त्यावेळेसही आपण आजच्या सारखे सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी प्रतिष्ठानला केली. यासाठी इतर तालुक्यातून स्वच्छता गाडी व जेसीबी उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच प्रतिष्ठानने स्वच्छता व्यतिरिक्त रक्तदान शिबीर राबविल्याबाबत प्रतिष्ठानचे अभिनंदन केले. आपण स्वच्छता कर्मचारी नसून आपण ही जनमागृती करायची की स्वच्छता ही आवश्यकता आहे. बीड जिल्हयातील अधिकारी कर्मचारी यांना विनंती आहे की जी स्वच्छता आज केली तशी कायम स्वरुपी दररोज स्वच्छता करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या स्वच्छता मोहिमे मध्ये प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पोलीस मुख्यालय व ग्राउंड, जलसंपदा विभाग, जलसिंचन जायकवाडी, सार्वजनिक बांधकाम विभाग, विक्रीकर विभाग, पंचायत समिती, दुय्यम निबंधक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय विश्रामगृह, तहसिल कार्यालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा कारागृह, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा वन विभाग, लाचलुचपत विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा कृषी कार्यालय, बीड बसस्थानक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, बी ॲन्ड सी एरीगेशन विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, शिवाजी नगर पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन सुभाष रोड, आरटीओ कार्यालय, मुस्लीम क्रबस्तान बालेपीर, मुस्लीम कब्रस्तान खासबाग, ख्रिश्चन स्मशानभुमी, हिंदु स्मशानभुमी मोंढा रोड, हिंदु स्मशानभुमी बार्शी रोड येथून 4 टन 500 किलो ओला कचरा व 114 टन 300 किलो सुका कचरा जमा केला आहे. या मोहिमेमध्ये विविध शासकीय कार्यालयाचे कार्यालय प्रमुख, कर्मचारी व जिल्हा न्यायालयाचे न्यायीक अधिकारी यांची उपस्थिती होती.
उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी आभार व्यक्त करताना स्वच्छतेबाबतीत ही सुरवात असुन याची शासकीय अधिकारी कर्मचारी व बीड शहराचे नागरिक नक्कीच बोध घेतील. पुढील मोहिमध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतील. कसल्याही फळाची आपेक्षा न करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सदस्य आलेत त्यांच्या या समर्पण भावाबद्दल अभिमान वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पद्मश्री डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने आज रोजी बीड शहरामध्ये 25 शासकीय कार्यालये, 3 स्मशानभूमी व 2 कब्रस्तान या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
