प्रत्येक जिल्ह्यात नेमणार आंतरभारती दुत
अंबाजोगाई - आंतरभारतीचा विस्तार करण्यासाठी येत्या वर्षात प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात आंतरभारती दूत नेमले जाणार आहेत.
अशी माहिती आंतरभारतीचे राष्ट्रीय सचीव अमर हबीब यांनी दिली. १० मे रोजी आंतर भारती दिनानिमित्त कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, आंतरभारती ही संस्था साने गुरुजी यांनी स्थापन केली आहे.. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी उपोषण केले होते. १० में रोजी मंदिर खुले करण्यात आले म्हणून हा दिवस आंतरभारती दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरभारती चे कार्यकर्ते व समर्थक दरवर्षी महाराष्ट्राच्या बाहेर हा दिवस साजरा करतात. या वर्षी कुरुक्षेत्र (हरयाणा) येथे हा दिवस साजरा करण्यात आला. त्यास देशभरातून सुमारे तीनशे कार्यकर्ते सामील झाले होते. इंदोर (मध्यप्रदेश) येथील सेवानिवृत्त कलेक्टर श्रीमती सूरज दामोर ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. 'नारी के सहभाग बिना हर बदलाव अधुरा या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले.अध्यक्षस्थानी आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य सदाविजय आर्य होते. डॉ. डी. एस. कोरे यांनी सूत्र संचालन केले. पुष्पा उतकर (औरंगाबाद), मनीषा यादव (अकोला) संविदा पंड्या (गुजरात), मीनाक्षी स्वामी, अरुणा चिमेगावे (उदगीर) व अमर हबीब (आंबाजोगाई) आदींनी या परिसंवादात भाग घेतला. आंतरभारतीचे राष्ट्रीय सचिव अमर हबीब यांनी आंतरभारतीची आगामी दिशा स्पष्ट करून कार्यक्रमांची घोषणा केली. आंतरभारती दुतही नवी कल्पना त्यांनी मांडली. एका जिल्ह्यातील कार्यकत्यनि दुसऱ्या जिल्ह्यात काम उभे करणे, अशी ही कल्पना आहे. जबाबदारी घेणाऱ्या कार्यकर्त्याला आंतरभारती दुत म्हटले जाणार आहे. बैठकीत अनेकांनी आंतरभारती दुत होण्याची इच्छा व्यक्त केली.म. गांधींच्या विचारांचा प्रचार व्हावा यासाठी आंतरभारती तर्फे राष्ट्रीय स्तरावर निबंध स्पर्धा घेतली जाईल. त्यासाठी अमर हबीब, संगीता देशमुख व कल्पना हेलसकर ही त्री सदसीय समिती निश्चित करण्यात आली. लातूर येथे नोव्हेंबर महिन्यात युवती शिबीर होईल असे डॉ बी. आर. पाटील यांनी सांगितले. तसेच लातूर जिल्ह्यात शिक्षकांची शिबिरे घेण्यात येणार आहेत. गुजरात मध्ये युवक शिबीर घेण्याची जबाबदारी संविदा पंड्या यांनी घेतली. या कार्यक्रमात शिवलिंग मठपती (उदगीर), डॉ डी एस कोरे (पुणे) संजय माचेवर (वसमत) या कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. आंतर भारतीच्या भारत दर्शन मोहीम अंतर्गत ११ ते १९ में या कालावधीत पंजाब, हरयाणा व हिमाचल प्रदेश दर्शन यात्रा काढण्यात आली. यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अडीच शे कार्यकर्ते सहभागी झाले असल्याची माहिती राष्ट्रीय सचीव अमर हबीब यांनी दिली.
