रेशीम शेडचे बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान मंजूर करा- आ. नमिता मुंदडा
अंबाजोगाई - बीड जिल्ह्यातील सन २०१५-१६ पुर्वीचे कीटक संगोपनगृह बांधकाम (रेशीम शेड) केलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान मंजूर करण्यात यावे अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी वस्त्रोद्योग मंत्री ना. अस्लम शेख यांच्या कडे केली आहे. या संदर्भात ना. अस्लम शेख यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील सन २०१५-१६ पूर्वी कीटक संगोपनगृह बांधकाम (रेशीम शेड) उभे केलेल्या पात्र ३५ लाभार्थ्यांना प्रती कीटक संगोपनगृह बांधकाम खर्च रु.८७,५००/- प्रमाणे ३५ लाभाथ्र्यांचे ३०,६२,५०० /- (तीस लक्ष बासष्ट हजार पाचशे रुपये अनुदान अद्यापही रेशीम उत्पादक शेतकऱ्यानां मिळालेले नाही. सदर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी शेड उभे करून आज जवळपास सहा ते सात वर्ष होऊन गेली आहेत. परंतु अद्यापही सदर लाभार्थी अनुदानापासून वंचित आहे. या बाबत जिल्हा रेशीम कार्यालय, बीड यांनी सन २०१५-१६ पूर्वीचे कीटक संगोपनगृह बांधकाम (रेशीम शेड) केलेल्या व आजमितीस अस्तित्वात असलेल्या ३५ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यास मान्यता देणे बाबतचा प्रस्ताव संचालक, रेशीम संचालनालय, मागपूर यांच्याकडे सादर केलेले आहे. तरी सदर प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याबाबत आदेश देऊन बीड जिल्हातील लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.
