निवारा हक्क समितीचे नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन
रखडलेली घरकुल योजना कार्यान्वित करण्याची मागणी
अंबाजोगाई - शहरात गेल्या अनेक वर्षांपासून घरकुलाच्या प्रस्तावात विविध प्रकारच्या त्रुटी दाखवुन या योजनेपासून अनेकजण दूर आहेत.त्यांना या योजनेचा लाभ द्यावा. या मागणीसाठी निवारा हक्क समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी केले.
यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन नगरपरिषदेचे प्रशासक यांना दिले.या निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या आहेत.प्रधानमंत्री घरकुल योजना व इतर घरकुल योजनांची अंबाजोगाई शहरात प्रभावी व सार्वत्रिक अमलबजावणी करावी. अंबाजोगाई शहरात एकूण एक लाख लोकसंख्या पार झाली आहे, त्यातील ४९ टक्के जनता गलिच्छ वस्त्यात राहते.या लोकांचा सर्व्हे करून त्यांना घरकुल मंजुर करा.भोगवटा धारकाचा सर्वे करून त्यांना मालकी हक्कात घ्या. शहरातील सर्वे नंबर १७ हा परिसर आवास योजनेसाठी आरक्षीत करण्यात यावा. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.यापूर्वीही अनेकदा याच मागणीसाठी आंदोलने झाली.तरीही शासन गांभीर्याने दखल घेत नाही.३०जून पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवारा हक्क समितीचे समन्वयक कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी दिला आहे.
या आंदोलनात विनोद शिंदे, रवि आवाडे, प्रदिप कोरडे, धीरज वाघमारे, वंदना प्रधान, सलिमा शेख, देविदास जाधव यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
