तारकेश्वर गडाच्या विकासासाठी 10 कोटी रुपये निधी देणार - धनंजय मुंडेंची घोषणा
आष्टी (प्रतिनिधी) - आष्टी तालुक्यातील तारकेश्वर गड हा संत नारायण बाबा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले वारकरी पीठ आहे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी असताना मला नारायण बाबांचा सहवास लाभला, त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून मला आशीर्वाद दिला होता. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त तारकेश्वर गडावर आलो असता, गडाच्या विकासासाठी सभा मंडप, भक्त निवास, रस्ता, हायमास्ट दिवे, पाणी पुरवठा असे एकूण 10 कोटी रुपयांची कामे मंजूर करणार असल्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
संत नारायण महाराजांच्या 11 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्ती सोहळ्यास धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घेतले, यावेळी गडाचे महंत ह. भ. प. आदिनाथ महाराज, आ. बाळासाहेब आजबे, आ. मोनिका ताई राजळे, सौ. सुनीता ताई गडाख, माजी आ. साहेबराव दरेकर, मा. आ. भीमराव धोंडे, सतीश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, विश्वास नागरगोजे, गहिनीनाथ सिरसाट, शिवाजी नाकाडे, अनिल महाराज पाटील यांसह आदी उपस्थित होते.
तारकेश्वर गड ते पाथर्डी या रस्त्याचे विस्तारीकरण करून, त्याचे दुपदरीकरण करण्यासाठी देखील आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान गडाने जेव्हा पण बोलावले तेव्हा धनंजय मुंडे आवर्जून गडावर येतात, निस्सीम भक्त म्हणून कोणत्याही अपेक्षेशिवाय दर्शन घेतात. अध्यात्म आणि राजकारण याची कधीही विसंगती होऊ देत नाहीत, ज्या प्रमाणे स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब सर्व सामान्य भक्त गणात सहभागी होऊन, आनंद साजरा करत, त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांची देखील विचारसरणी व वागणूक दिसुन येते, आम्हाला आज स्व. मुंडे साहेबांचे प्रतिरूप धनंजय मुंडे यांच्या मध्ये दिसते, असे गौरवोद्गार तारकेश्वर गडाचे महंत ह. भ. प. आजीनाथ महाराज शास्त्री यांनी बोलताना काढले.
Friday 13th of May 2022 05:17 PM
