पेट्रोल पंपात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून २० लाख रुपये हडपले
पंप मालकासह पत्नी आणि नातेवाईकावर गुन्हा
बीड - पेट्रोल पंपात ५० टक्क्यांची भागीदारी देण्याच्या बहाण्याने पंप चालकाने महावितरणच्या सेवानिवृत्त ऑपरेटरकडून २० लाख रुपये घेतले. त्यानंतर भागीदारी देण्यास टाळाटाळ करून त्याबदल्यात जमीन देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर जमीनही दिली नाही आणि पैसेही परत केले नसल्याच्या आरोपावरून अंबाजोगाई तालुक्यातील पेट्रोल पंप चालकावर बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरणमधून सेवानिवृत्त झालेले ऑपरेटर मोहम्मद मेराज गुलाब मोहम्मद (रा. सराफा रोड, बीड) यांच्या फिर्यादीनुसार, सहा वर्षापासून त्यांची पेट्रोल पंप चालक अशोक बळीराम पवार (रा. देवळा, ता. अंबाजोगाई ह.मु. शिवनेरी कॉलनी, बीड) सोबत ओळख आहे. अशोक पवार यांचा चंदन सावरगाव (ता. केज) येथे पेट्रोल पंप आहे. त्या दोघात नेहमी आर्थिक व्यवहार देखील होत असत पेट्रोल पंपाचे लोड घेण्यासाठी पवार याने अनेकदा मोहंमद मेराज यांच्याकडून लाखो रुपये उसने घेऊन ते परत केले होते. २०१९ साली मोहम्मद मेराज सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांना ७० लाख रुपये सेवानिवृत्तीची रक्कम प्राप्त झाली. यावेळी पवार यांनी त्यापैकी ३ लाख रुपये द्या, त्या बदल्यात मी तुम्हाला पेट्रोल पंपात ५० टक्क्यांची भागीदारी देतो, तुमचा मुलगा मोहम्मद जुनेदला पंप चालवायला देऊ असे आमिष दाखवले. यापूर्वीचे व्यवहार पवार यांनी व्यवस्थित पूर्ण केले असल्याने मो. मेराज यांच्या त्यावर विश्वास होता. तरीदेखील त्यांनी अशोक पवारची पत्नी शीला अशोक पवार आणि त्यांचा नातेवाईक नवनाथ सीताराम सावंत यांना मध्यस्थी घेऊन २०१९ साली पवार यास २० लाख रुपये दिले. मात्र, काहीच दिवसात पवारने पंपात भागीदारी देण्यास टाळाटाळ केली आणि अखेर नकार दिला. त्याऐवजी दिलेल्या २० लाखांच्या बदल्यात देवळा (ता. अंबाजोगाई) येथील दोन एकर जमीन देण्याचे आश्वसन देऊन इसार पावती करून दिली. मात्र, त्यानंतर पवार दांपत्य आणि सावंत या तिघांनीही जमीन देण्यास टाळाटाळ सुरु केली. एवढेच नव्हे तर सदरील जमिनीवर जाणीवपूर्वक २० लाखांचे कर्ज उचलून सातबारावर बँकेचा बोजा देखील टाकला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मोहम्मद मेराज यांनी शिवाजीनगर ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अशोक पवार, शीला पवार आणि नवनाथ सावंत या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
