Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

खरवस दूध खाल्ल्याने ३२ जणांना मळमळ, उलटी

माजलगाव तालुक्यातील प्रकार : २० बालकांचा समावेश

दिंद्रुड : खरवस दूध खाल्ल्याने जवळपास ३२ जणांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला आहे. यात २० बालकांचा समावेश असून १२ जणांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा प्रकार माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथे रविवारी रात्री ७ वाजता उघडकीस आला. चोपनवाडी येथील मधुकर पंढरीनाथ वनवे यांच्या म्हशीचे जवळपास १० लिटर कोवळे दूध गावातीलच संपर्कातील व्यक्तींना रविवारी सकाळी वाटण्यात आले होते. ज्या लोकांना हे दूध देण्यात आले आणि ज्यांनी ते खाल्ले अशा सर्वांनाच उलटी, मळमळ, जुलाब असा त्रास सुरू झाला. हा प्रकार समजताच रुग्णांना दिंद्रुड, पात्रुडच्या खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. यात काही बालकांचाही समावेश होता; परंतु जवळपास १२ जणांना अधिक त्रास असल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चोपनवाडीचे ग्रामस्थ रमेश वनवे यांनी सांगितले की, हे सर्व खरवस दूध खाल्ल्याने झाले असून आरोग्य विभागाला संपर्क साधणे सुरू आहे. जास्त गंभीर कोणी नसले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे ते म्हणाले.

आरोग्य यंत्रणा कामाला

चोपनवाडीच्या प्रकाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांना माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांना घटनास्थळी जाऊन आढावा घेण्याच्या सूचना केल्या. आता आरोग्य यंत्रणा गावात पाेहोचत असल्याचे सांगण्यात आले.

या लोकांचा समावेश

सोमित्रा वनवे, जनाबाई वनवे, गंगाराम मुंडे, दैवशाला मुंडे, विशाल शिंदे, पल्लवी शिंदे, सना शेख, महेबूब शेख, राणी वनवे, बबन कांदे, संतोष मुंडे, आदित्य अंगद वनवे, अनिकेत अंगद वनवे, समीर शेख, कावेरी मुंडे, राधाबाई जाधवर, करण पडुळे, रोहन पडुळे यांच्यासह जवळपास ३२ जणांचा समावेेश आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Sunday 17th of October 2021 10:37 PM

Advertisement

Advertisement