Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

पुण्यातून कार चोरणारे दोघे गजाआड

केज-कार चोरी करून पुण्यातून बाहेर पडलेले चोर तब्बल ३०० किमीवर जीपीएसमुळे पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले. केज पोलिसांनी दोघांना चोरीच्या कारसह मोठ्या शिताफीने शुक्रवारी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावर ताब्यात घेतले. परमेश्वर सिताराम विढे (२५, रा. साकुड ता. अंबाजोगाई जि. बीड) व हेमंत भरत चौधरी (२८, रा. रूपीनगर तळवडे, ता. हवेली जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पुणे आणि बीड पोलिसांचा आपसातील ताळमेळ यातून अवघ्या १२ तासात कारच्या (क्र. एमएच-१४/जीक्यू-२२२९) चोरीचा उलगडा झाला.

पुणे जिल्ह्यातील निगडी येथील त्रिवेणी चौकात केबल सर्विसची एक कार (क्र. एमएच-१४/जीक्यू-२२२९) गुरुवारी रात्री चोरीस गेली. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी लागलीच कार चोरीचा तपास सुरु केला. कारमध्ये GPS असल्याने पोलिसांनी लोकेशन ट्रेस सुरु केले. यावेळी चोरटे कारला बीडच्या दिशेने घेऊन गेल्याचे लक्षात आले. पुणे पोलिसांनी याची माहिती बीड पोलिसांना दिली.

दरम्यान, पहाटे कारचे लोकेशन केज तालुक्यातील पिंपळगाव फाटा येथे दिसले. यावरून सायबर बँचचे पोलीस नाईक अनिल मंदे यांनी तात्काळ ही माहिती केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार नागरगोजे, पोलीस नाईक अनिल मंदे, महिला पोलीस नाईक धायगुडे, महिला पोलीस शिपाई जाधव यांनी मुख्य रस्त्यावरील पोलीस स्टेशनसमोर सापळा लावला. बीडकडून संशयित कार (क्र. एमएच-१४/जीक्यू-२२२९) शहरात येताना दिसली. पोलिसांनी कार अडवून त्यातील संशयित आरोपी परमेश्वर सिताराम विढे व हेमंत भरत चौधरी यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी जमादार थोरात यांच्या ताब्यात आहेत.

Friday 24th of September 2021 08:29 PM

Advertisement

Advertisement