Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

यंदाही ऑनलाईन; बालगोपाळांना शाळेचे सुख नाहीच!

बीड : शाळेचा पहिला दिवस... नवीन युनिफॉर्म, नवीन दप्तर, नवीन वह्या पुस्तके, नवा बूट, नवे मोजे आणि शाळेत गेल्यानंतर नवा वर्ग, नवे शिक्षक अशा सर्व काही नव्या अनुभवाला मुकलेल्या बालगोपाळांना यावर्षीही गत सालाप्रमाणे ऑनलाईन अभ्यासाने यंदाच्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा करावा लागणार आहे.

२०१९ मध्ये प्रत्यक्ष शाळेत जावून पहिला दिवस अनुभवणारे विद्यार्थी यंदा सलग दुसर्‍या वर्षी शाळेच्या पहिल्या दिवसाच्या अनुभवाला मुकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता तिसरीत असताना शाळेची पायरी चढली होती ते विद्यार्थी यंदा पाचवीला जाताना चौथीप्रमाणेच घरात बसूनच पाचवीच्या वर्गात जाणार आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी गत वर्षभरात प्रत्यक्षात शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. मार्चमध्ये कोरोनाने सर्वकाही ठप्प झाले आणि परीक्षेला मुकलेली ही पिढी  एक दिवसही शाळेत न जाता  वरच्या वर्गात गेली. विशेषत: इयत्ता ९ वी तून दहावीत गेलेली पिढी  परीक्षा न देता चक्क दहावी उत्तीर्णचे सर्टिफिकेट घेवून शाळेतून बाहेर पडली आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अद्याप कायम आहे. कोरोनाची ही लाट संपली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. तर काहींच्या मते असे काही होणारच नाही असेही म्हटले जात आहे. त्यामुळे पालक वर्ग  संभ्रमावस्थेत आहे.  शाळा प्रत्यक्षात सुरू होणार नसल्याने संसर्गाचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. जरी काही दिवसांनंतर कोरोनाचा संसर्ग खूप झाला आणि शाळा प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी किती पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास उत्सुक असतील हे कोणीही सांगू शकत नाही.

बालगोपाळांच्या पदरी यंदाही निराशा

आपण पहिल्या दिवसापासून शाळेत जावून मित्र, मैत्रिणी, डबा, मैदानी खेळ याचा आनंद लुटू अशी स्वप्नं पाहणार्‍या बालगोपाळांच्या नशिबी यंदाही शाळेचा पहिला दिवस दुर्दैवाने हुकला आहे. कोरोनाने कोणाचे आई-बाबा हिरावले, कोणाचे काका- काकू, आजी-आजोबा हिरावले.  शिक्षण घेणार्‍या संपूर्ण पिढीचे  एक वर्ष तर हिरावलेच आता दुसरे वर्षही त्याच मार्गावर आहे. कोरोना लवकरात लवकर संपून आम्हाला पुन्हा एकदा शाळामाउलीच्या प्रांगणात बागडण्याची संधी कधी मिळेल या प्रतीक्षेत असणार्‍या बालगोपाळांच्या पदरी यंदाही निराशा पडणार हे  मात्र निश्चित आहे.

Tuesday 15th of June 2021 11:52 AM

Advertisement

Advertisement