Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

लोखंडीच्या कोविड रुग्णालयात फॅबिफ्लू गोळ्या आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा

जिल्हा शल्य चिकित्सकांचे अक्षम्य दुर्लक्ष; अत्यावश्यक औषधी उपलब्ध करून देण्याची आ. मुंदडांची मागणी

अंबाजोगाई : तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या फॅबिफ्ल्यू गोळ्या आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा सातत्याने तुटवडा निर्माण होत आहे. जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांचे या रुग्णालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी लोखंडीच्या रुग्णालयात त्वरित औषधी आणि इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

'विवेक सिंधू न्यूज'चे अँड्राॅईड‌ ‌‌मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मागील वर्षी लोखंडी सावरगाव येथे सर्वात मोठे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात आले. व्हेन्टीलेटर आणि ऑक्सिजनसह या ठिकाणी बेड उपलब्ध करून देण्यात आले. नवी इमारत आणि सर्व सुविधा असल्याने लोखंडीच्या रुग्णालयाकडे आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णांचा ओढा वाढला. सध्या या येथील दोन्ही इमारतीत मिळून सातशे पेक्षाही अधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. येथील डॉक्टरही तज्ञ आहेत, परंतु अत्यावश्यक औषधी उपलब्ध नसल्याने त्यांची अवस्था शस्त्रास्त्राविना लढणाऱ्या योद्ध्यासारखी झाली आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्राधान्याने आवश्यक असलेल्या फॅबिफ्लू गोळ्यांचा सतत तुटवडा निर्माण होत आहे. तसेच, गंभीर रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनही उपलब्ध नाहीत. त्यामुळे उपचार करणे अवघड झाल्याने सौम्य लक्षणे असणारेही रुग्ण औषधांअभावी गंभीर होत आहेत. औषधी उपलब्ध नसल्याने रुग्ण आणि डॉक्टर, रुग्णालय स्टाफ यांच्यात वाद होण्याचे प्रकारही सातत्याने घडत आहेत. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक सुर्यकांत गित्ते यांना वारंवार कळवूनही त्यांचे लोखंडीच्या रुग्णालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. बीड पेक्षा लोखंडीला रुग्णसंख्या अधिक असूनही औषधी आणि इंजेक्शनच्या बाबतीत बीडला कैक पटीने झुकते माप देण्यात येत असून येथील रुग्णांच्या जीवाशी खेळ चालू आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर इतर आजारांवरील औषधी देखील येथे उपलब्ध होत नाही आणि गित्ते यांच्याकडून त्यासंदर्भात पाठपुरावाही केला जात नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन लोखंडीच्या रुग्णालयात  फॅबिफ्ल्यू गोळ्या आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा मुबलक पुरवठा करावा अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.

Tuesday 4th of May 2021 12:23 PM

Advertisement

Advertisement