Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

रेमडीसिवीरचा तुटवडा : इंजेक्शन मिळविण्यासाठी परजिल्ह्यात धावाधाव

इंजेक्शनचा काळा बाजार तेजीत, प्रशासन मात्र झोपेत; सामान्यांचे बेहाल

 बीड : कोरोनाबाधितांवर उपचारात रेमडिसिवीर इंजेक्शनचा डोस महत्वाचा समजला जातो. परंतु बुधवारी जिल्ह्यातील हा साठा पूर्णपणे संपला होता. खाजगी रूग्णालयांसह सामान्य नागरिक हे इंजेक्शन मिळविण्यासाठी इतर जिल्ह्यांमध्ये धावाधव करीत असल्याचे सांगण्यात आले. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. आता सामान्यांनी वाचायंच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच गंभीर रूग्णांची संख्याही मोठी आहे. त्यांना रेमडिसिवीर इंजेक्शनसह फॅबीफ्लू गोळ्या दिल्या जात आहेत. सध्या तरी कोरोनावर जास्त प्रमाणात रेमडिसिवीरचा वापर होत आहे. परंतू वाढत्या मागणीमुळे जिल्ह्यातील हा साठा बुधवारी संपला होता. त्यामुळे शासकीय रूग्णालयातच नव्हे तर खाजगीत उपचार घेणाऱ्यांना परजिल्ह्यात हे इंजेक्शन मिळतेय का? याचा शोध घ्यावा लागला. तसेच काही खाजगी रूग्णालयांनी ढिसाळ प्रशासनावर अवलंबून न राहता पुणे, मुंबई, अहमदनगर आदी जिल्ह्यातून हे इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तरी या इंजेक्शनसाठी सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करावा, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

काळ्या बाजारात ७ हजाराला इंजेक्शन

सध्या रेमडिसिवीरचा तुटवडा जाणवत असल्याने काळ्या बाजारात याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासकीय दरानुसार १४०० रूपयांना मिळणारे हे इंजेक्शन काळ्या बाजारात ७ हजार रूपयांपर्यंत विकले जात असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. एका खाजगी रूग्णालयात एका रूग्णाने हे इंजेक्शन खरेदी केले होते.

कोवीड सेंटरला १० अन् नसलेल्यांना ५० इंजेक्शन

बीडमधील एका खाजगी रूग्णालयात कोवीड सेंटरची परवानगी नसतानाही त्यांना ५० इंजेक्शन देण्यात आले. तर जेथे बाधित रूग्ण उपचार घेतात, त्यांना केवळ १० इंजेक्शन दिले. हा प्रकार सोमवारी रात्री १० वाजता एका एजन्सीवर घडल्याचे सूत्रांनी सांगितले. १४०० रूपयांचे इंजेक्शन १४६८ रूपयांना दिल्याचेही सांगण्यात आले. यावरून वितरणातही मोठा घोळ केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रशासन करतेय काय?

कोरोनामुळे रोज ५ ते १० लाेकांचा जीव जात आहे. इकडे एकाच सरणावर ८ लाेकांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. इंजेक्शनसह औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने सामान्यांचा जीव धोक्यात आला आहे. कोरोनावर उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील सहा होलसेलर्सकडे स्टॉक नव्हता. इतर ठिकाणी ३५० रेमडिसिवीर उपलब्ध होते. आणखी ३ हजार इंजेक्शनची मागणी केली आहे.
- रामेश्वर डोईफोडे, औषध निरीक्षक, बीड
  • रोज अंदाजे मागणी - ४०० ते ६०० इंजेक्शन
  • बुधवारी उपलब्ध साठा ३५०
  • एका इंजेक्शनची शासकीय किंमत १४०० रूपये

Thursday 8th of April 2021 07:56 AM

Advertisement

Advertisement