Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कोरोना रुग्णांसाठी ३९ खाजगी रुग्णवाहिका अधिग्रहित

बीड : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ने-आण करण्यासाठी जिल्ह्यात ३९ खाजगी रुग्णवाहिका तत्काळ अधिग्रहित कराव्यात असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड आणि अंबाजोगाई येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. दररोज पाचशे पेक्षाही अधिक लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णवाहिकांची संख्या अतिशय कमी असल्याने रुग्णांची ने-आण करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या जीवितालाही धोका होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांच्याकडील रुग्णवाहिका कोरोना संसर्ग नसणाऱ्या रुग्णांसाठी वापरात आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकांची आवश्यकता भासत होती. हीच निकड लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.०७) जिल्ह्यातील एकूण ३९ खाजगी रुग्णवाहिका अधिग्रहित करून त्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश बीड आणि अंबाजोगाई येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

या ३९ रुग्णवाहिका पैकी बीड, गेवराई, आष्टी, धारूर, वडवणी, माजलगाव, केज या तालुक्यांसाठी प्रत्येकी दोन, लोखंडीचे वृद्धत्व आरोग्य केंद्र आणि स्त्री रुग्णालयासाठी प्रत्येकी दोन, पाटोदा, शिरूर का. तालुक्यासाठी प्रत्येकी एक, परळी तालुक्यासाठी पाच, अंबाजोगाई तालुक्यासाठी सहा, जिल्हा रुग्णालयासाठी पाच, जिल्हा रुग्णालय शववाहीकेसाठी एक, खंडेश्वरी सीसीसी आणि लोखंडीच्या नर्सिंग कॉलेजसाठी प्रत्येकी एक रुग्णवाहिका देण्यात यावी असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे.

Wednesday 7th of April 2021 10:10 PM

Advertisement

Advertisement