Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

बीड जिल्हा बँकेवर प्रशासक मंडळ नियुक्त

अपर आयुक्त अविनाश पाठक यांची मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची नुकतीच निवडणूक झाली. परंतु, संचालक मंडळाचे कोरम पूर्ण न झाल्याने नवीन संचालक मंडळ स्थापित होऊ न शकलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली आहे. प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद विभागाचे अपर आयुक्त अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. भाजपच्या ताब्यात असलेली बीड जिल्हा बँक त्यांच्या ताब्यातून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन खेळी केली होती. अनेक मतदारसंघात उमेदवारच मिळाले नाहीत. परिणामी, बीड जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. यामध्ये प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद विभागाचे अपर आयुक्त अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासोबत प्रशासक मंडळात शिखर बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, सनदी लेखापाल जनार्दन रणदिवे, सहाय्यक निबंधक अशोक कदम आणि ॲड. अशोक कवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अशा घडल्या होत्या नाट्यमय घडामोडी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागील महिन्यात झालेल्या निवडणुकीत १९ पैकी ११ जागा रिक्त राहिल्या असून उर्वरित ८ पैकी ५ जागा राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास पॅनल, १ जागा अपक्ष (राजकिशोर मोदी) तर प्रत्येकी १ जागा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आमदार सुरेश धस समर्थकांना मिळाली. मात्र, कोरम पूर्ण होत नसल्याने हे संचालक मंडळ स्थापित करता येत नसल्याचे सहकार प्राधिकरणाने राज्य सरकारला कळविले होते. त्यामुळे, आता बँकेवर ५ सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी अपर आयुक्त अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली.

Wednesday 7th of April 2021 08:39 PM

Advertisement

Advertisement