Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार

कोरोनामुळे अंबाजोगाईतील परिस्थिती विदारक

अंबाजोगाई :  शहरातील स्वाराती रुग्णालय आणि लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या पॉझिटिव्हचा रुग्णांचा आकडा दररोज शंभरच्या पुढे वाढत असताना मृत्यूचा दर देखील झपाट्याने वाढत आहे. स्वाराती रुग्णालयात सात व लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अग्निडाग देण्यात आला. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने अंबाजोगाईत मरण स्वस्त झाले असेच म्हणावे लागेल. 

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय व लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये परळी, केज, धारूर, गंगाखेड, माजलगाव आदी तालुक्यातील रुग्ण कोरोनावरील उपचारासाठी येतात. कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे विकार असे ६० ते ८० वयोगटातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने हे सर्व रुग्ण अंगावर आजार काढून जास्त झाल्यानंतरच रुग्णालय गाठतात त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढू लागली आहे.

अंबाजोगाई तालुक्यात चार दिवसामध्ये पाचशेच्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तरीदेखील नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येते. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृत्यूंचे प्रमाण कमी असले तरी अंबाजोगाई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. सोमवारी मंगळवार पेठ, भटगल्ली, बोरखेड (परळी), लोखणी दावारागाव, अंबलटेक, आपेगाव, मंगरूळ (माजलगाव) व धारूर या आठ गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. मृत पावलेल्या रुग्णावर मंगळवारी दुपारी पठाण मांडवा रस्त्यावरील पालिकने निर्माण केलेल्या कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग देण्यात आला. या आठ मृतांमध्ये एक महिला असून सर्व रुग्ण ६० वर्षापुढील आहेत. 

अंबाजोगाईमध्ये मरण स्वस्त असेच म्हणावे लागले. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आज कठोर निर्बंध लादलेले असतानाही नागरिक गंभीर नसल्याचे दिसून आले. नेहमी प्रमाणेच शहरातील मुख्य रस्ते गजबजलेले दिसून आले. दरम्यान, आज दुपारी घाटनांदूर येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिच्या पार्थिवावर उद्या बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शासनाच्या कठोर निर्बंधाचे पालन केले तर कोरोनाचा आकडा कमी होऊ शकतो असा दावा प्रशासनाने केला आहे.

सात महिन्यात दुसरी वेळ :

दरम्यान, यापूर्वी मागील वर्षी ६ सप्टेंबर रोजी अंबाजोगाईत याच ठिकाणी आठ मृतांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बरोबर सात महिन्यानंतर मंगळवारी पुन्हा तीच दुर्दैवी वेळ आली.

Tuesday 6th of April 2021 06:57 PM

Advertisement

Advertisement