Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

मदत केंद्रातील कर्मचाऱ्याला कक्षसेवकाकडून मारहाण

जिल्हा रूग्णालयातील प्रकार : कोरोना अहवाल घेण्यावरून पेटला वाद

बीड : कोरोना अहवाल घेण्यावरून मदत केंद्रातील एका कर्मचाऱ्याला कक्षसेवकाने दारू पिऊन मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजेच्यानंतर जिल्हा रूग्णालयात घडली. याची अद्यापतरी कोठेही तक्रार नसली तरी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मदत केंद्रात धाव घेत हा वाद मिटविला. या प्रकरणाने जिल्हा रूग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे.

जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत व्हावी, यासाठी कोरोना सुरू होताच मदत केंद्र सुरू करण्यात आले. मागील महिन्यापासून येथे कोरोनाबाधितांचे अहवालही दिले जात आहेत. एकच टेबल असल्याने येथे कायम गर्दी असते. रविवारीही येथे नेहमीप्रमाणेच गर्दी होती. रात्रीच्या सुमारास कोरोना काळात भरती केलेला कक्षसेवक येथे आला. माझ्या नातेवाईकाचा अहवाल द्या, असे म्हणत मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालू लागला. शाब्दीक चकमकीनंतर थेट कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर हा प्रकार जिल्हा शल्य चिकित्सकांना कळविण्यात आला. त्यांनी रूग्णालयात धाव घेत वाद मिटविला. सोमवारी सकाळी संबंधित कर्मचाऱ्याला लेखी तक्रार देण्यासही सांगितले होते. परंतु दुपारपर्यंत त्याने काहीच दिले नसल्याचे डॉ.गित्ते म्हणाले. हा वाद मिटविण्यासाठी आरोग्य विभागातीलच काही अधिकाऱ्यांनी कष्ट घेतल्याचे सूत्रांकडून समजते. मारहाण करणारा कर्मचारी येथीलच एका कर्मचाऱ्याचा नातेवाईक होता. त्याने वरिष्ठांशी संवाद साधून अंधारातून हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते.

एसीएसच्या कक्षात गुप्त चर्चा

मदत केंद्रातील वादाचा निषेध सोशल मिडीयावर व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सोमवारी दुपारी अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना बोलावून घेतल्याचे सांगण्यात आले. बंद दरवाजाआड चर्चा झाल्यानंतर दोघांनीही स्वता:च्या 'सुखा'साठी शांत राहणे पसंत केले. २० मिनीटांच्या चर्चेत हे प्रकरण 'मॅनेज' झाल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत मदत केंद्रातील कर्मचाऱ्याशी वारंवार संपर्क केला, परंतु त्याने फोन घेतला नाही.

जिल्हा रूग्णालयातील मदत केंद्रातील वादाबाबत समजताच आम्ही सगळे तेथे गेलोत. सर्व शांत केले. संबंधित कर्मचाऱ्याला लेखी देण्यास सांगितले होते. अद्याप या प्रकरणात लेखी स्वरूपात माझ्याकडे काहीच आलेले नाही. त्यामुळे मी पुढील कारवाई करू शकत नाही.
- डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

Tuesday 6th of April 2021 12:45 AM

Advertisement

Advertisement