जिल्ह्यातील लॉकडाऊन संपले; नवीन निर्बंध लागू
वैद्यनाथ, योगेश्वरी मंदिर उघडणार; सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड होणार
बीड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी 26 मार्च पासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याची मुदत आज संपल्यानंतर नव्याने जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी केले आहेत. दरम्यान नव्या आदेशात जिल्हात पुन्हा लॉकडाऊन केले नसले तरी कडक निर्बंध मात्र लागु राहणार आहेत. तसेच नव्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील योगेश्वरी आणि वैद्यनाथ मंदिराचे कुलूप अखेर उघडले जाणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत ही मंदिरे खुली राहणार आहेत.
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी रविवारी (दि.4) नविन आदेश जारी केले. त्यानुसार जिल्ह्यात कडक निर्बंध असतील, त्याचे पालन नागरिकांनी करावे अशा सुचना केल्या आहेत. दरम्यान बीडसह राज्यात कोरोना वाढत असल्यामुळे राज्य सरकारने उद्या पासुन राज्यात कडक नियम लागु करण्याची घोषणा केलेली आहे. यामुळे राज्याने लागु केलेले नियम जिल्ह्यात लागु राहणार आहेत. यासह इतर कडक नियम जिल्ह्यात लागु केले आहेत. जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागु केले नसले तरी जिल्ह्यात कोरोना माञ अजुनही आहे. जिल्हा प्रशासनाच्या नव्या आदेशानुसार आता जिल्ह्यात सार्वजनिक वाहतुकीसह चहाची दुकाने, टपर्या उघडता येणार असल्या तरी हॉटेल, रेस्टोरंट, मॉल, सार्वजनिक ठिकाणे बंदच राहणार आहेत. केवळ दहावी आणि बारावीच्या खाजगी क्लासेसला 50 % क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 8 यावेळेत बर्यापैकी व्यवहार सुरु ठेवता येणार आहेत. मात्र हॉटेल, रेस्टोरंट, मॉल, सिनेमागृहे, सार्वजनिक बगीचा आदी ठिकाणे बंदच राहणार आहेत. हॉटेल बंदी मधून चहा विकणार्या छोट्या टपर्यांना वगळण्यात आले आहे, मात्र त्यांनी मास्क नसलेल्या ग्राहकांना चहा देऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेल बंद करण्यात आल्या असल्या तरी सकाळी 7 ते सायंकाळी 8 यावेळेत त्या पार्सल सुविधा देऊ शकणार आहेत. जिल्ह्यात रात्रीच्यावेळी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन केल्यास 1 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या नव्या आदेशानुसार कामाच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे, सार्वजनिक व खासगी वाहनातून प्रवास करतांना मास्क वापरावा. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय तसेच व्यापारी औद्योगिक संस्थेमध्ये काम करणार्या कर्मचार्यांसाठी गरजेनुसार घरुन काम करण्याची मुभा देण्यात यावी. या कार्यालयाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही अशी विभागणी करण्याचे सांगण्यात आले आहे.
सर्व कार्यालयांमध्ये येणार्या कर्मचारी तसेच ग्राहकांसाठी शरीराचे तापमान तपासणे, हात धुणे व सॅनिटायझरची व्यवस्था बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच 5 एप्रिल पासून रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असुन उल्लंघन करणार्यांना 1 हजार रुपयाचा दंड केला जाईल. विनामास्क आढळल्यास 500 रु. तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणताही व्यक्ती थुंकताना आढळल्यास 1 हजार रुपये दंड केला जाणार आहे.
सभा,मोर्चे,मेळाव्यांना बंदी कायम
जिल्ह्यात प्रतिबंध आदेशानुसार रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत सर्व सिनेमा हॉल, सभागृहे, रेस्टॉरंट बंद राहतील. भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि दुकानदारांना कोरोना तपासणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास संबंधीतास 500 रु. दंड केला जाईल. याशिवाय कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक, राजकीय, धार्मीक कार्यक्रमासह सभा, मोर्चे, मिरवणूका, संम्मेलने यात्राउत्सव इत्यादीचे आयोजन करण्यास परवानगी असणार नाही. सभागृहे, नाट्यगृहे यासाठी वापरता येणार नाहीत.
विवाहासाठी पोलीसांची परवानगी लागणार
विवाहासाठी 50 लोकांची परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्यासाठी अगोदर स्थानिक पोलीस निरीक्षकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच विवाहास उपस्थित राहणार्या 50 व्यक्तींची यादी आणि त्या प्रत्येकाचे कोरोना तपासणी केल्याचे अहवाल सोबत ठेवावे लागणार आहेत.
