Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कोरोना रुग्णाच्या मृत्युनंतर डॉक्टर, नातेवाईकांत हाणामारी

बीडच्या माऊली हाॅस्पिटलमधील प्रकार; उपचारात हलगर्जी केल्याचा आरोप

बीड : उपचारात हलगर्जी झाल्यामुळेच रूग्णाचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून डॉक्टर, नातेवाईकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. बीड शहरातील माऊली हॉस्पिटलमध्ये रविवारी दुपारी चार वाजता हा प्रकार घडला. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

बीड तालुक्यातील गवळवाडी येथील ७० वर्षीय रुग्ण २६ मार्चला बीड शहरातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तेथून त्याला २९ मार्चला माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. प्रकृती चिंताजनक असल्याने संबंधित रूग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी अचानक त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यानंतर नातेवाईकांना बोलावून घेत डॉक्टरांनी रूग्ण मयत झाल्याचे सांगितले. आताच बोललेला रूग्ण अचानक कसा काय मरू शकतो, असा संशय व्यक्त करीत त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. यावर बाचाबाची होऊन डॉक्टर, नातेवाईकांमध्ये सुरूवातील शिवीगाळ झाली. नंतर वाढून याचे हाणामारीत रूपांतर झाले. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. नातेवाईक व डॉक्टरांनी एकमेकांविरोधात तक्रार देणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. तहसीलदार शिरीष वमने यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन दोघांच्या बाजू समजून घेतल्या. सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला नव्हता. हॉस्पिटलबाहेर मोठा जमाव जमला होता.

महसूलचा माणूस येतो, कक्षात बसून जातो

मयत रूग्णांच्या नातेवाईकांनी आपली कैफियत तहसीलदारांसमोर मांडली. शनिवारी रात्री महसूलच्या वाहनातून एक माणूस उतरतो. डॉक्टरच्या कक्षात अर्धा ते एक तास बसतो आणि निघून जातो. तो तपासणी करायला आला असेल तर नातेवाईक, रूग्णांशी संवाद साधणे आवश्यक होते. नसेल आला तर कोरोना रूग्णालयात असे येता येते का? असा सवाल उपस्थित करून चौकशी करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली. खाजगी रूग्णालयांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगणमत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला.

माझ्या वडिलांची हत्या केली
माऊली हॉस्पिटलमध्ये कसल्याच सुविधा नाहीत. आयसीयूमध्ये डॉक्टर नाहीत. स्टाफ लक्ष देत नाहीत. वडिलांच्या उपचारात हलगर्जी झाल्यानेच मृत्यू झाला आहे. मृत्यू नव्हे तर या डॉक्टरांनी हत्याच केली आहे. त्यांच्यावर कारवाई करून कोरोना सेंटरचा परवाना निलंबीत करावा, अशी मागणी मयत रूग्णाच्या मुलाने केली. तसेच या हॉस्पिटलमध्ये खाजगी लोकांचा हस्तक्षेप असून आवाज उठविणाऱ्या नातेवाईकांना मारहाण करण्यासाठी गुंड ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. डॉक्टरांनी मला आणि माझ्या भावाला खाली पाडून मारहाण केल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.
२९ मार्चला रूग्ण दाखल झाला. तात्काळ कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. स्कोअर देखील १३ होता. आमच्याकडून हलगर्जी झालेली नाही. जर झालेली असेल तर रितसर तक्रार करावी. मारहाण करणे हा गुन्हा आहे. आम्ही याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहोत.
- डॉ. किरण सवासे, माऊली हॉस्पिटल बीड

Monday 5th of April 2021 07:22 AM

Advertisement

Advertisement