Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आई - बाबा, आमच्या सुरक्षेसाठी मास्क वापरा..

ग्रामीण भागातील बालकांचा हट्ट : कोरोनापासून संरक्षणासाठी मुलेही सरसावली

माजलगांव (धनंजय माने) : जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागातकोरोनारुग्णवाढत आहेत . यावर नियंत्रणासाठी मास्क , सोशल डिस्टन्सिग , सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे . याबाबत घरातील मुले पालकांना या त्रिसूत्रीचे पालन करण्याचा हट्ट धरत असून यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाविषयक नियमांचे पालन होताना दिसत आहे . 

कोरोनाचे संकट दूर होत आहे , असे वाटत असताना पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने सगळेच चिंताग्रस्त झाले आहेत . मागील वर्षी मार्च महिन्यातच कोरोनामुळे देशभरातील शाळा बंद कराव्या लागल्या होत्या . आठ दहा महिन्यांनंतर काही वर्ग सुरू करण्यात आले , परंतु संसर्ग वाढू लागल्याने तेही आता बंद आहेत . बीड जिल्ह्यात प्रशासनाने सध्या लॉकडाऊन जाहीर केला असला तरी रुग्णसंख्या वाढतच आहे . अशा कठीण परिस्थितीत ग्रामीण भागात मुले पालकांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याविषयी सांगत आहेत .

       ज्यांना घराबाहेर पडणे गरजेचे आहे त्यांनी मास्कचा वापर करावा , सोशल डिस्टन्सिग पाळावे , ठराविक वेळेने हाताची स्वच्छता करावी . यामुळे कोरोनापासून संरक्षण होऊ शकते ही बाब आता सर्वश्रुत झाली असली तरी याची उजळणी बच्चेकंपनी करत आहेत . ग्रामीण भागातदेखील आता याबाबतची सजगता निर्माण झाली असून मुख्यमंत्री , आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला लहान मुले प्रतिसाद देत आहेत . पालकही मुलांच्या या हट्टामुळे आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी नियमांचे पालन करत आहेत . ग्रामीण भागातील बाजारपेठेची गावे , सार्वजनिक ठिकाणे तसेच शेतीसंबंधित कामे करताना नियमांचे पालन होत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होत आहे .

मुलांनीही घ्यावी काळजी

 मुलांना रिकरंट व्हायरल इन्फेक्शन होत असतात , त्यामुळे त्यांच्यात प्रतिकारशक्ती निर्माण होते . म्हणूनच कोरोनाच्या बाबतीत प्रौढ लोकांच्या तुलनेत लहान मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याचे दिसून येते . शिवाय मुलांना कोरोना झालाच तर तब्येतीत अधिक गुंतागुंत होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे . असे असले तरीही मुलांनी मास्क वापरणे , खेळून आल्यावर हात - पाय स्वच्छ घुणे , नाक - कान - डोळे यांना वारंवार स्पर्श न करणे आणि खेळतानाही एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवूनच खेळणे , अशी काळजी घेणे गरजेचे आहे. माजलगांव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.मधुकर घुबडे आरोग्य तालुका अधिकारी यांनी सांगितले .

"मास्क घातल्याशिवाय बाहेर जाऊ नका . गर्दीत जाणे टाळा . सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा . ज्यांना सर्दी , खोकला असा त्रास आहे , त्यांच्यापासून सामाजिक अंतर पाळा असे मी आई - बाबांना सांगते .
-भावना गुलबुले, विद्यार्थिनी .
"महत्त्वाचे काम असल्याशिवाय आमच्या घरातील कोणीच घराबाहेर जात नाही . माझे वडील वकील असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा तालुक्याच्या ठिकाणी जावे यावे लागते . ते बाहेर पडताना मास्क लावतात , सॅनिटायझर , सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याविषयी मी नेहमीच सांगत असतो . 
- शुभम केदार , विद्यार्थी .

Sunday 4th of April 2021 11:22 PM

Advertisement

Advertisement