Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

गारगोटी मंदिर परिसरात विनापरवाना बांधकाम करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे तहसीलदार यांचे आदेश

वडार समाजाचे नेते सुभाष गुंजाळ यांचा आत्मदहनाचा इशारा

गेवराई : वडार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गेवराई येथील गारगोटी देवीच्या मंदिराची संरक्षण भिंत पडून सरकारी जागेत अनधिकृत व्यापारी गाळ्याचे बांधकाम करणाऱ्या विरुद्ध कारवाई करून सदर बांधकाम तातडीने  थांबवण्याचे आदेश तहसिलदार गेवराई यांनी दिले आहेत. दरम्यान संबंधितावर कारवाई न झाल्यास आपण कोल्हेर रोडवर दि.५ एप्रिल रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा वडार समाजाचे नेते सुभाष गुंजाळ यांनी दिला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरातील सर्वे नंबर ५८ मधील वडार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गेवराई येथील गारगोटी देवीच्या मंदिराची संरक्षण भिंत पडून सरकारी जागेत अनधिकृत व्यापारी गाळ्याचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी वडार समाजाचे नेते सुभाष गुंजाळ यांनी विभागीय आयुक्त,  जिल्हाधिकारी, गेवराई नगरपालिका, तहसीलदार, पोलीस ठाणे गेवराई यांच्याकडे निवेदन देऊन केली होती सर्वे नंबर ५८ मधील  ही जागा सरकारी मालकीची असून आ. लक्ष्मण पवार व त्यांच्या कुटुंबियांनी जागेच्या मालकीहक्क बाबत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयात प्रकरण सुरू असतांना या जागेवर अतिक्रमण करून व्यापारी गाळ्यांचे बांधकाम राजरोस सुरू आहे, हे बेकायदेशीर बांधकाम करतांना कोल्हेर रोडवरील गारगोटी देवीच्या मंदिराची संरक्षण भिंती या समाजकंटकांनी पाडली, याबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांचेकडे वारंवार अर्ज करूनही त्यांनी कारवाई केली नसल्याचा आरोप सुभाष गुंजाळ यांनी केला आहे. वडार समाजाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे दोषी विरुद्ध कारवाई व्हावी यासाठी आपण दि. ५ एप्रिल रोजी  आत्मदहन करणार असल्याचे सुभाष गुंजाळ यांनी शेवटी सांगितले आहे. विनापरवाना बांधकाम करणाऱ्या विरोधात कारवाई करणे बाबत तहसीलदार यांनी आदेश दिले असले तरी याप्रकरणी नगर परिषद कारवाई करत नसल्याने सुभाष गुंजाळ आत्मदहनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. याप्रकरणी कोणती कारवाई होते याकडे गेवराईकरांचे लक्ष लागले आहे.

Sunday 4th of April 2021 09:45 PM

Advertisement

Advertisement