Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

विवाह सोहळ्याचे आयोजन महागात पडले

आयोजकांसह २५ जणांवर गुन्हा दाखल; खा.संभाजीराजे भोसले, आ.प्रकाश सोळंकेंची सोहळ्याला उपस्थिती

माजलगांव (प्रतिनिधी):- कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश असताना सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून लग्नसोहळा साजरा केल्या प्रकरणी आयोजकासह २५ जणांविरोधात माजलगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या विवाह सोहळ्याला आमदार- खासदार यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       खा. संभाजीराजे भोसले, आ. प्रकाश सोळंके यांचीही या विवाह सोहळ्याला उपस्थिती होती.

मागील ११ वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बाळू ताकट हे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात. यावर्षीही त्यांनी ३१ जोडप्यांचे सामुहिक विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. तसे नियोजनही करण्यात आले होते. या विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शविण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. संभाजी महाराज भोसले यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करून प्रशासनाने गर्दीच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर निबर्ंंध घातले. ऐनवेळी सदरील विवाह समारंभास परवानगी नाकारण्यात आली. अशा परिस्थितीत काल हा विवाह सोहळा पार पडला. सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमी झाली. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. त्यामुळे रात्री उशिरा माजलगांव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई अमृत मोहन पाटोळे यांच्या फिर्यादीवरून माजलगांव शहर पो.स्टे गु.र.नं.६७/२१ कलम १८८.२६९.भा.द.वी सह कलम ५१(ब)आपत्ती व्यवस्थापक  कायदा २००५ ,सह कलम १७,१३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमक नुसार आयोजक बाळु ताकट, राहूल मुगदिया, ऋषिकेश शेंडगे, प्रशांत होके, सुरज पवार, संजय डिग्रस, अमर राजमाने, अतुल होके, प्रदीप जाधव, सचिन सुरवसे यांच्यासह अज्ञात १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला खा. संभाजीराजे भोसले, माजी मंत्री तथा माजलगांव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंंके यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

Monday 22nd of February 2021 07:35 PM

Advertisement

Advertisement