एसएफआयचे थकीत शिष्यवृत्तीसाठी बीडमध्ये आंदोलन
बीड : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. आंदोलनातील मागण्यांचे निवेदन राज्याचे मा. मुख्यमंत्री यांना मा. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठवण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची मागील वर्षाची शिष्यवृत्ती, फेलोशिप आणि स्वाधार योजनेची रक्कम आजपर्यंत प्रलंबित आहे. म्हणून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन प्रलंबित समस्या त्वरित निकाली लावाव्यात. यांसह शेतकरी आंदोलनास पाठिंबा आणि नुकतेच पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थी-युवकांच्या आंदोलनावर झालेल्या प्रचंड दडपशाहीचा निषेध करण्यासाठी एसएफआयने हे आंदोलन केले.
या आंदोलनातून एसएफआयने पुढील मागण्या केल्या आहेत. (१) राज्यातील थकीत शिष्यवृत्ती, फेलोशिप, स्वाधार योजनेची रक्कम त्वरित वितरित करावी. (२) राज्यातील सर्व आदिवासी शाळांची वसतिगृहे, समाजकल्याण विभागाची शासकीय वसतिगृहे, विद्यापीठ वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी त्वरित खुली करा. तत्पूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण करावे. (३) ऑनलाईन परीक्षा घेणे थांबवून परीक्षा पूर्ववत पध्दतीने घेण्यात याव्यात. (४) विद्यार्थ्यांना बसपास आणि रेल्वे पास त्वरित वाटप करावे. (५) आयटीआय विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा पद्धती कायमची बंद करावी आणि पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घ्याव्यात. (६) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अडवून अवाजवी शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करावी. (७) सर्व शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना लवकर सुरू करावी. (८) विद्यापीठात कार्यक्रम घेण्यासाठी केंद्राची परवानगी मागणारा नागपूर विद्यापीठाचा लोकशाही विरोधी निर्णय रद्द करावा. (९) शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण, केंद्रीकरण वाढवणाऱ्या अनेक तरतुदी नवीन शैक्षणिक धोरणातून काढून टाकाव्यात. यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात आवश्यक त्या सुधारणा कराव्यात.
या आंदोलनामध्ये एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, माजी राज्य अध्यक्ष मोहन जाधव, कुंडलिक खेत्री, तालुका सचिव अभिषेक शिंदे, तालुका उपाध्यक्ष कृष्णा मगर, तालुका सहसचिव शिवा चव्हाण, रवि जाधव, विकास गायकवाड, अजय सपकाळ, दत्ता सुरवसे, शंकर चव्हाण, सुनील राठोड, योगेश चव्हाण आदी सहभागी झाले होते.
