Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

21 गावातील स्वच्छता अभियानानंतर शिवजयंती साजरी

गेवराई  - तालुक्यातील रेवकी जिल्हा परिषद गटात बी.एम.प्रतिष्ठाणच्या वतीने 21 गावात जाऊन स्वच्छता अभियान राबविल्यानंतर गोंदी याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. तसेच भगवा ध्वज मिरवणूक काढून जयंती उत्साहात साजरी करुन समारोप करण्यात आला. भगव्या ध्वजामुळे गोंदी गावात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. बी.एम.प्रतिष्ठाणची हि शिवजयंती लक्षवेधी तसेच समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारी ठरली.

   साधकांनी सेवक व्हावे, सेवकांनी सुधारक व्हावे आणि सुधारकांनी समाज विकासाचे व्रत हाती घ्यावे असे संत गाडगेबाबांच्या विचाराप्रमाणे बी.एम.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी रेवकी जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या गावात यावर्षी आदर्श व भव्य-दिव्य व श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवून शिवजयंती साजरी केली. गावा-गावात श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविताना ते स्वतः यामध्ये सहभागी झाले. हे अभियान रेवकी गटातील दि. 6 ते 12 फेब्रुवारी दरम्यान मन्यारवाडी, गोविंदवाड़ी, ढोक वडगाव, पांढरवाडी, बागपिंपळगाव, बेलगाव, म्हाळस पिंपळगाव, सावळेश्वर, खामगांव, आगरनांदूर, नागझरी, विठ्ठलनगर, बागपिंपळगाव कँम्प, दैठण, कटचिंचोली, लुखामसला, गोंदी, हिंगणगाव, संगम जळगाव, रेवकी, देवकी, कोल्हेर या 21 गावात रात्री मुक्कामी राहून व सकाळी उठल्यावर तेथील शाळा, मंदिर, सार्वजनिक ठिकाण, रस्ते झाडू स्वच्छ करण्यात आले. या उपक्रमामध्ये युवक, तरुण, ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी होत श्रमदानातून गाव स्वच्छतेला हातभार लावला. तर या गावातून एकाच गावात जयंतीदिनी शिवरायांना अभिवादन करून जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर चिठ्ठ्या टाकून यामधील एक चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये गोंदी येथील चिठ्ठी निघल्याने शुक्रवार दि.19 फेब्रुवारी रोजी येथे भव्य असा भगवान ध्वज गावातून मिरवून छत्रपती शिवरायांना अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने अभिवादन करण्यात आले. भगव्या ध्वजामुळे गोंदी गावात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, शिवप्रेमी व नागरिक उपस्थित होते.

Saturday 20th of February 2021 08:47 PM

Advertisement

Advertisement