अंबाजोगाईत शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
अंबाजोगाई : शहरातील रुख्माई नगर भागात राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१९) सकाळी उघडकीस आली.
मनोजकुमार प्रभाकर पोटभरे (वय ३५) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. ते सध्या धारूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कर्तव्य बजावत होते. गुरुवारी (दि.१८) रात्री ११ वाजताच्या सुमारास सर्व कुटुंबीय झोपी गेल्यानंतर मध्यरात्रीतून कधीतरी त्यांनी साडीच्या साह्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत माहिती मिळताच अंबाजोगाई शहरचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस कर्मचारी कल्याण देशमाने, फुके यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला. शुक्रवारी दुपारी मनोजकुमार पोटभरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिठ्ठी लिहून आत्महत्या ?
दरम्यान, मनोजकुमार पोटभरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या याप्रकरणी तपास सुरु असून त्यानंतरच पोटभरे यांच्या आत्महत्येमागचे कारण समोर येऊ शकणार आहे.
