वाढत्या अपघाती मृत्यूंमुळे संतप्त आ. नमिता मुंडदांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
अंबाजोगाईत रस्ते विकास महामंडळाची बैठक; रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा, पुलाच्या बाजूला डांबरीकरणाचे डायर्व्हशन तयार करा, केज-नेकनूरमधील रस्त्यांचे रूंदीकरण करण्याच्या दिल्या सूचना
अंबाजोगाई : रस्त्याच्या रखडलेल्या कामाने व वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गैरसोयींनी अंबाजोगाई व परिसरात अपघातांचे सत्र वाढले आहे. हे वाढते अपघात रोखण्यासाठी रखडलेले रस्त्याचे काम लवकर मार्गी लावा. अशी सूचना आ. नमिता मुंदडा यांनी केली.
अंबाजोगाईत शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने आ. नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित अधिकाºयांशी संवाद साधतांना आ. नमिता मुंदडा बोलत होत्या. या बैठकीस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, युवानेते अक्षय मुंदडा, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव, एच.पी.एम. कंपनीचे संचालक अजय देशमुख, तांत्रिक सल्लागार रविकुमार, अभियंता निवृत्ती शिंदे, विकास देवळे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत आ. नमिता मुंदडा यांनी उपस्थित अधिकाºयांचे विविध समस्यांवर लक्ष वेधले. पिंपळा ते मांजरसुंबा या ८२ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. अत्यंत मंद गतीने सुरू असलेल्या या कामामुळे रहदारीस मोठ्या अडथळे निर्माण होत आहेत. काम सुरू करण्याअगोदरच रस्त्यांवर खड्डे खोदून ठेवण्यात येत असल्याने याचा मोठा त्रास वाहनचालकांना होतो. रखडलेल्या कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशा सूचना त्यांनी केल्या. मुदतीपूर्वी काम पूर्ण करा. अशा सूचना देऊन जिथे पुलाचे काम सुरू आहे. तिथे डांबरी रस्त्याचे डायर्व्हशन करा. भाटुंबा व कळमअंबा येते चार नळ्यांचे पूल बांधण्यात यावेत. नेकनूर व केज शहरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. अंबाजोगाई शहरात लोखंडी सावरगाव ते यशवंतराव चव्हाण चौक या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. शहरातील भगवानबाबा चौक व यशवंतराव चव्हाण चौक यांचे सुशोभीकरण करा. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही. तोपर्यंत रस्ते खोदू नका. अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीत कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांनी पिंपळा ते मांजरसुंबा या रस्त्याच्या ८२ कि.मी. पैकी ७५ कि.मी. काम पूर्ण झाल्याचे सांगितले. आ. नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी या बैठकीत दिले. या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख, अॅड. संतोष लोमटे, अनंत आरसुडे, अमोल जाधव, रमाकांत पाटील, अविनाश मुडेगावकर,अभिजित जगताप, रमाकांत उडाणशिव यांची उपस्थिती होती.
