केज : तालुक्यातील होळ शिवारात शेतातील ज्वारी कणसे चोरून नेण्याचा प्रकार घडला असून, विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या आरोपावरून अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी शेतकरी दत्ता उर्फ दत्तात्रय रामराव घुगे (वय ४४, रा. होळ, ह.मु. जिवाचीवाडी, ता. केज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० मार्च रोजी सायंकाळी चारच्या सुमारास ते आपल्या सर्वे नं. २९० क शेतात ज्वारीच्या कणसांचा ढिगारा पाहणीस गेले असता आरोपी ढिगाऱ्यातील कणसे पोत्यात भरत होते.
फिर्यादीने त्यांना विरोध केला असता आरोपी रामचरण उर्फ बंडु तुकाराम घुगे याने त्यांचा गचुरी धरून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी आरोपींनी “इथे पुन्हा आलास तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर सर्व आरोपींनी ज्वारी कणसांचे पोते भरून नेले, ज्यामुळे फिर्यादीचे अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
सदर फिर्याद्वारून रामनाथ लक्ष्मण घुगे, रंजेश लक्ष्मण घुगे, रामचरण उर्फ बंडु तुकाराम घुगे, अशोक तुकाराम घुगे, बाळासाहेब तुकाराम घुगे, भागाबाई लक्ष्मण घुगे, वसंत मारुती घुगे, शालिकराम मारुती घुगे, भिमराव अर्जुन घुगे, अनिल बाळासाहेब घुगे, भागवत महादेव घुगे (सर्व रा. होळ, ता. केज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बिक्कड करत आहेत.