अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा विकास आराखडा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. स्वाराती रुग्णालयातील खाटांची संख्या ४५० वरून वाढवून ११५० करून सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. या महत्त्वपूर्ण घडामोडीमागे केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे महत्त्व आहे.
अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे आरोग्यसेवा होणार सक्षम
आ. नमिता मुंदडा यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्याला यश
ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळावी, स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी नवी दारे खुली व्हावीत यासाठी आमदार मुंदडा यांनी राज्य पातळीवर सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली.
या बैठकीत रुग्णालयाच्या मास्टर प्लॅनचा आढावा घेण्यात आला. रुग्णालयातील खाटांची संख्या ४५० वरून ११५० करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तसेच आधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी सेवा, उत्कृष्ट वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश असलेला आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आमदार नमिता मुंदडा यांनी ग्रामीण आरोग्य सेवेसाठी आवाज उठवून या रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम प्रत्यक्षात आणले आहे. मराठवाड्यातील लाखो रुग्णांना आता बीड जिल्ह्यातच तज्ज्ञ सेवा मिळणार असून, उपचारासाठी पुणे-मुंबईसारख्या महानगरांकडे धाव घेण्याची वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. हा निर्णय ग्रामीण आरोग्यसेवेच्या इतिहासात महत्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या लोकोपयोगी महत्त्वाच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.