Breaking
Updated: फेब्रुवारी 11, 2026
बीड पोलीस भरती प्रक्रियेत १६०० मीटर धावल्यानंतर उमेदवाराचा हृदयद्रावक मृत्यू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: जिल्हा पोलीस दलातील १७४ पोलीस शिपाई पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मैदानी चाचणी अंतर्गत १६०० मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण केल्यानंतर एका २६ वर्षीय उमेदवाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. दीपक भास्कर वाव्हळे (वय २६, रा. मांडखेल, ता. परळी, जि. बीड) असे मृत उमेदवाराचे नाव असून, या घटनेमुळे भरती प्रक्रियेवर शोककळा पसरली आहे.
पोलीस मुख्यालय बीड येथील मैदानावर आज ८०० पैकी ६१८ उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर झाले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीनुसार, दीपक वाव्हळे यांनी दुपारी १२:५५ वाजता १६०० मीटरचे अंतर धावून पूर्ण केले. त्यानंतर विश्रांती घेत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते स्वतः चालत मैदानांवरील मेडिकल रूमकडे गेले. तेथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना आयव्ही (IV) लावले, मात्र तपासणीत त्यांची नाडी कमी असल्याचे आढळल्याने तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
दुपारी १:१४ वाजता दीपक यांना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेसा आहार आणि पाणी घ्यावे, असे आवाहन केले आहे.