Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

लोखंडी सावरगावचे शेतकरी अरुण देशमुख यांचे राज्यस्तरीय वेबिनारमध्ये मार्गदर्शन.

Updated: फेब्रुवारी 19, 2026

By Vivek Sindhu

लोखंडी सावरगावचे शेतकरी अरुण देशमुख यांचे राज्यस्तरीय वेबिनारमध्ये मार्गदर्शन.

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पोकरांतर्गत बेडवर टोकन पद्धतीने लागवडीचे झालेले फायदे बाबत केले मार्गदर्शन

जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत “लागवडपूर्व तंत्र – हमखास यशाचा मंत्र” या विषयावर आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारमध्ये लोखंडी सावरगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. अरुण देशमुख यांनी ‘बेडवर टोकण’ पद्धतीचे प्रत्यक्ष अनुभव मांडले. सदर वेबिनार युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रसारित करण्यात आला असून राज्यभरातील शेतकरी, महिला शेतकरी, बचत गट सदस्य तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सभासद यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

संवादादरम्यान त्यांनी खरीप हंगाम २०२० पासून ही पद्धत अवलंबत असल्याचे सांगितले. पारंपारिक पेरणीच्या तुलनेत सुमारे पन्नास टक्के बियाण्याची बचत होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. नियोजित अंतरावर हातचलित टोकण यंत्राद्वारे लागवड केल्यामुळे बियाण्यांचा अपव्यय टळतो, रोपांची वाढ एकसारखी होते व उत्पादनक्षमतेत वाढ होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टीच्या परिस्थितीत बेड व सरी पद्धतीमुळे अतिरिक्त पाणी सरीवाटे शेतातून बाहेर निघून जाते, त्यामुळे पाणी साचत नाही व वाफसा परिस्थितीत पिकाचे नुकसान टळते. तसेच कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीत बेडमध्ये शोषून घेतलेले पाणी पिकाला उपलब्ध होत राहते, त्यामुळे पीक तग धरून राहते व वाढ जोमदार होते, असे त्यांनी नमूद केले.

सदर वेबिनारमध्ये प्रकल्पाचे मृद विशेषज्ञ तथा कृषीविद्या विशेषज्ञ विजय कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी या राज्यस्तरीय संवादात सहभाग नोंदविला. तसेच संबंधित शेतकरी श्री. अरुण देशमुख यांना तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर व कृषी सहाय्यक पंडित काकडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले होते.

कमी खर्च, बियाण्याची बचत आणि हवामान बदलास पूरक अशी ‘बेडवर टोकण’ पद्धत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे या वेबिनारमधून स्पष्ट झाले.


Categories

Recent Posts