आष्टी : केळसांगवी येथील एका वृद्ध महिलाच्या घरात अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास घरफोडी करून सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
विजया गंगाधर घुले (वय ६५) असे फिर्यादीचे नाव असून त्या केळसांगवी (ता. आष्टी, जि. बीड) येथे राहतात. त्यांनी आष्टी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जेवण करून त्या व त्यांच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून स्लॅबवर झोप घेतली होती. त्यानंतर रात्रीतून कधीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील दोन तोळ्याचे सोन्याचे जुने गंठण आणि १ लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल घाडगे करीत आहेत.