Breaking

अंबाजोगाईत तरुणाला लुटणारे टोळके जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Updated: फेब्रुवारी 26, 2026

By Vivek Sindhu

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: शहरात एका तरुणाला दुचाकीवर बसवून नेऊन त्याला लुटणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. ही धाडसी कारवाई गुरुवारी २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली असून पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरलेला मोबाईल जप्त केला आहे. या प्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, होळ येथील रहिवासी शेख इम्रान दस्तगीर हे ७ फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई येथील सानिका बिअर बारजवळ थांबले होते. त्यांना त्यांच्या मित्राला ऑनलाइन पैसे पाठवायचे होते, मात्र त्यांच्याकडे सुविधा नसल्याने ते मदतीसाठी विचारपूस करत होते. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी त्यांना ऑनलाइन पैसे पाठवण्यास मदत करण्याचे आमिष दाखवले आणि दुचाकीवर बसवून आडस रोडकडे नेले. तिथे निर्जन स्थळी नेऊन आरोपींनी इम्रान यांना मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. सुमित अरुण गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने सापळा रचून सुमित अरुण गायकवाड, विनय गोविंद जगधने, विश्वजीत विश्वास गंडले आणि शिवम जनक कसबे या चारही आरोपींना अंबाजोगाई परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत आणि अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पूर्ण केली.


Categories

Recent Posts