अंबाजोगाई : शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा बंदोबस्ताला आव्हान दिले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या चार ठिकाणी दुकाने फोडून ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही सर्व ठिकाणे वर्दळीच्या भागात असूनही चोरट्यांनी निर्भीडपणे हात साफ केल्याने पोलीस बंदोबस्तावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नगर परिषदेसमोर असलेल्या मुख्य रस्त्यावरील पॅराडाईज वाईन शॉप, प्रशांत नगरमधील डॉ. तट यांचा दाताचा दवाखाना व बनाळे यांचे किराणा दुकान, तसेच कलावती हॉस्पिटलखालील मेडिकल स्टोअर अशी चार ठिकाणे या चोरट्यांनी लक्ष्य केली. या चोऱ्यांमध्ये नेमका कितीचा ऐवज चोरीला गेला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पॅराडाईज वाईन शॉपमध्ये स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या तीन चोरट्यांनी चोरी केली असल्याचे प्राथमिक सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीही चोरी झाली होती. त्या प्रकरणातील चोर अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यातच आता पुन्हा चार दुकाने फोडून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेलाच थेट आव्हान दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
गस्ती पथक कुचकामी? गस्तीसाठी पोलिसांची गाडी रात्री फिरते, परंतु इतक्या वर्दळीच्या भागात सलग चार ठिकाणी चोरी होत असताना गस्ती पथक काय करत होते, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांनी तातडीने ठोस कारवाई करून चोरांचा शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.