Breaking
Updated: फेब्रुवारी 17, 2026
सतीश मुंडे हत्या प्रकरणातील पाच आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगौतम बचुटे/केज :- धाराशिव जिल्ह्यातील चोरखळी येथील कला केंद्रावर मारहाणीत झालेल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील औषध विक्रेता सतीश मुंडे मृत्यू प्रकरणातील अटक असलेल्या पाचही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बीड जिल्ह्यातील साळेगाव ता. केज येथील औषध विक्रेते सतीश मुंडे हे दि. १२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मित्रा सोबत धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रावर नाचगाणे पाहण्यासाठी गेले होते. तिथे दारूच्या नशेत त्यांच्या भांडण झाले. त्या भांडणाचा व मागील काही वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून गावाकडे परत येत असताना दि. १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गावाकडे परत येत असताना शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्दन गित्ते आणि दत्ता बाबासाहेब तोंडे त्यांनी संगनमत करून सतीश मुंडे यास छातीत व पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्या मारहाणीतच सतीश मुंडे यांचा मृत्यू झाला.
सतीश मुंडे याचा मृत्यू झाल्या नंतर शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी याने रात्री १:०० वाजण्याच्या सुमारास सतीश मुंडे याला त्याच कारमधून साळेगाव येथे त्याच्या घरी घेऊन आला. घरी आल्या नंतर सतीश मुंडे यांच्या आई वडीलांना त्याने सांगितले की, सतीश मुंडे हा खूप दारू पिलेला असल्याने तो बेशुद्ध पडला आहे. सतीश मुंडे यांच्या वडिलांनी सतीश यास आवाज दिला असता त्याने काही हालचाल केली नाही किंवा प्रतिसाद दिला नाही. म्हणून सतीश मुंडे यांचे वडील, चुलते आणि चुलत भाऊ यांनी सतीश मुंडे याला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. परंतु तेथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांना अंबाजोगाई येथे जाण्याचा सल्ला दिला. अंबाजोगाई येथे सतीश मुंडे याला घेऊन गेल्या नंतर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतीश मुंडे मयत झाल्याचे घोषित केले.
त्या नंतर मयत सतीश मुंडे यांचे वडील भागवत बळीराम मुंडे यांनी दि. १५ फेब्रुवारी रोजी येरमाळा जि. धाराशिव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्दन गित्ते आणि दत्ता बाबासाहेब तोंडे (सर्व रा. साळेगाव ता. केज जि. बीड) यांच्या विरुद्ध गु. र. नं. ३८/२०२६ भा. न्या. सं. १०३, १९१(२), ११५(२) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्दन गित्ते आणि दत्ता बाबासाहेब तोंडे या पाच जणांना ताब्यात घेऊन अटक केले.
या खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी कळंब न्यायालयात हजर केले असता सर्व पाचही आरोपींना दि. १८ फेब्रुवारी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस कोठडीतील आरोपीं कडून या हत्या प्रकरणातील आणखी काही गुन्हेगारांची नावे उघड होण्याची शक्यता असून मयत सतीश मुंडे याला महाकाली कला केंद्रात आणखी कुणी मारहाण केली हे स्पष्ट होईल.
येरमाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्या भालू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे हे तपास करीत आहेत.