Breaking

माहिती अधिकाराचा राग; माजी सरपंचासह ८ जणांचा वृद्धावर प्राणघातक हल्ला, बोट छाटले आणि पायही तोडला

Updated: मार्च 27, 2026

By Vivek Sindhu

बोट छाटले आणि पायही तोडला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: माहिती अधिकारांतर्गत ग्रामपंचायतीच्या कामाची माहिती मागवल्याच्या रागातून भाटसांगवी येथे एका ६४ वर्षीय वृद्धावर आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात माजी सरपंचासह एकूण ८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलभीम बापुराव बोरवडे (वय ६४, रा. भाटसांगवी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, भाटसांगवी आणि औरंगपूर ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये मागील १५ वर्षांत झालेल्या विकासकामांबाबत त्यांनी माहिती अधिकाराद्वारे माहिती मागवली होती. याच कारणावरून आणि सोशल मीडियावरील एका वादावरून आरोपींनी त्यांच्याशी शत्रुत्व धरले होते. २३ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास बलभीम बोरवडे हे आपल्या कुटुंबासह इनोव्हा गाडीतून बीडला जाण्यासाठी निघाले असता, शामराव पडुळे आणि संतोष पडुळे यांनी त्यांची दुचाकी आडवी लावून रस्ता अडवला. त्यानंतर दोन स्कॉर्पिओ गाड्यांमधून आलेल्या इतर आरोपींनी हातात तलवार, लोखंडी रॉड, पाईप आणि काठ्या घेऊन बोरवडे यांच्यावर हल्ला चढवला.

या भीषण हल्ल्यात शामराव पडुळे याने तलवारीने केलेल्या वाराने फिर्यादीच्या डाव्या हाताची करंगळी कापली गेली. संतोष पडुळे याने लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत फिर्यादीचा हात फॅक्चर झाला असून डाव्या पायाच्या नडगीचे दोन तुकडे झाले आहेत. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीचा मुलगा विजय बोरवडे यालाही आरोपींनी लोखंडी पाईप आणि काठ्यांनी गंभीर जखमी केले, तर संतोष गुंड आणि शरद गुंड यांनी त्यांच्या तोंडावर चटणीची पूड फेकली. जखमींवर सध्या बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपळनेर पोलिसांनी या प्रकरणी शामराव विश्वंभर पडुळे, संतोष शामराव पडुळे, सुदाम पडुळे, सुजित पडुळे, कमलेश सोपान बोरवडे, प्रदीप संदीपान सोनवणे, संतोष गुंड आणि शरद गुंड यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चैनसिंग गोलवाल करत आहेत.


Categories

Recent Posts