Breaking
Updated: फेब्रुवारी 13, 2026
कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची १४ लाखांची फसवणूक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: सरकारी योजनांमधून कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची १४ लाख ७८ हजार २९ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात पुणे येथील एका महिलेसह तिच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार मलसिंग दामु जाधव (वय ६८ वर्षे, व्यवसाय शेती, राहणार केकत पांगरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड) यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद दिली आहे. जाधव यांची डिसेंबर २०२० मध्ये गेवराई येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ जोती राजेंद्र ढाकणे (राहणार ससाणेनगर, हडपसर, पुणे) नावाच्या महिलेशी भेट झाली होती. तिने आपली ‘संधी बहुउद्देशीय सेवा केंद्र’ नावाने पुणे येथे संस्था असून याद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध योजनांमधून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.
या आमिषाला बळी पडून जाधव आणि त्यांच्या ओळखीचे इतर सात शेतकरी कर्ज मिळवण्यासाठी तयार झाले. आरोपी महिलेने प्रोसेसिंग फी आणि टॅक्सच्या नावाखाली जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून वारंवार पैशांची मागणी केली. डिसेंबर २०२० ते मार्च २०२४ या कालावधीत संशयित आरोपी जोती ढाकणे आणि तिच्या कार्यालयातील एका अनोळखी कर्मचाऱ्याने वेळोवेळी रोख ७ लाख रुपये आणि बँक खात्यावर ७ लाख ७८ हजार २९ रुपये असे एकूण १४ लाख ७८ हजार २९ रुपये उकळले. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही कर्ज न मिळाल्याने आणि आरोपींनी संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात जोती राजेंद्र ढाकणे आणि एका अनोळखी कर्मचाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर सुंदरसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश पांडुरंग कोठाकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.