Breaking

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची अंबाजोगाई येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहाला भेट; सोयीसुविधांची केली पाहणी

Updated: जानेवारी 10, 2026

By Vivek Sindhu

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची अंबाजोगाई येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहाला भेट

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी अंबाजोगाई येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मुलींच्या शासकीय वसतिगृहाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी वसतिगृहातील सोयीसुविधांची बारकाईने तपासणी केली आणि विद्यार्थिनींशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या व गरजा जाणून घेतल्या.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वसतिगृहाच्या दैनंदिन कामकाजाची पद्धत आणि विद्यार्थिनींना पुरवण्यात येणाऱ्या भौतिक सोयीसुविधांची सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी भविष्यात आणखी कोणत्या सुविधांची आवश्यकता भासू शकते, याबाबत विचारणा केली. यावेळी मुलींची ग्रंथालयाची निकड लक्षात घेऊन, वसतिगृहात सुसज्ज ग्रंथालय कोठे आणि कशा प्रकारे तयार करता येईल, यावर त्यांनी वसतिगृहाच्या गृहपाल समृद्धी भवरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

या भेटीप्रसंगी समृद्धी भवरे यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात मिळवलेली विशेष कौशल्ये आणि त्यांना मिळालेल्या बक्षिसांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. वसतिगृहाचे कामकाज आणि विद्यार्थिनींची प्रगती पाहून जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थिनींच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान, अपर जिल्हाधिकारी दीपक वंजोळे, उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे आणि तहसीलदार विलास तरंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.


Categories

Recent Posts