Breaking
Updated: डिसेंबर 20, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अपर पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी चेतना एस. तिडके यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अन्वये अंबाजोगाई आणि परळी शहरातील एकूण २३ उपद्रवी इसमांना संबंधित क्षेत्रात प्रवेश बंदी करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकांचे निकाल जाहीर होताना शहरात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य घडू नये आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून शांततेचा भंग होऊ नये, या उद्देशाने ही खबरदारी घेण्यात आली आहे.
सदर आदेशानुसार, अंबाजोगाई शहर आणि परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना २० डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२:०१ वाजेपासून ते २१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत संबंधित तालुक्यात किंवा नगर परिषद हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ २० डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या व्यक्तींना दोन तासांची सवलत देण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्यांना हद्दीबाहेर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अंबाजोगाई शहरातून सहा जणांवर ही कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये रविवार पेठेतील आदीनाथ ऊर्फ गोट्या बिरु थाटकर, वडारवाड्यातील गौरव राजाभाऊ कुचेकर, बोधीघाटातील आर्यन नरेश मांदळे, गांधीनगरमधील आकाश गोवर्धन नेहरकर ऊर्फ बिलाल, बाराभाई गल्लीतील नोमान मेहमुदमियाँ कुरेशी आणि पटाईत गल्लीतील बबलु सतिष पटाईत यांचा समावेश आहे. या सहा जणांना संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
परळी शहरातून सर्वाधिक १७ जणांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामध्ये गणेश प्रल्हाद गंजेवार, बाबासाहेब सुर्यभान बळवंत, गफारशा फय्याज सय्यद, अजय पंडीत रोडे, निखील कैलास फड, कैलास बालासाहेब फड, श्रीनाथ विनोद गंजेवार, संतोष दगडुबा मस्के, सनि अर्जुन देवडे, सोमनाथ संगप्पा सलगरे, संदीप भास्कर फड, शिवाजी महादेव मुंडे, महादेव जोतीबा ढाकणे, हनुमान साहेबराव दराडे, वैजनाथ सुभाष जाधव, लक्ष्मण महादेव ठोंबरे आणि तानाजी शेषेराव बागवाले यांचा समावेश आहे. या सर्व १७ व्यक्तींना परळी शहर व नगर परिषद हद्दीत येण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सर्व संबंधित इसमांना नोटीस बजावण्यात आली आहे. आदेशाच्या कालावधीत जर यापैकी कोणतीही व्यक्ती अंबाजोगाई तालुक्यात किंवा परळी नगर परिषद हद्दीत आढळून आली, तर नागरिकांनी तत्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.