Breaking
Updated: June 29, 2025
WhatsApp Group
Join Nowनांदेड: येथील माऊली भक्त उद्योजक भारत विश्वनाथ रामीनवार यांनी आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरास एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या मुकुटाची किंमत तब्बल एक कोटी ५ हजार रूपये एवढी आहे.
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीत स्वतःला अर्पण करणारे नांदेड येथील उद्योजक भारत रामीनवार हे आपल्या कुटूंबीयांसोबत १७ जून रोजी आळंदी येथे श्री माऊलीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी आपल्या भक्तीचा अनोखा ठसा उमटवत त्यांनी माऊलीचरणी तब्बल एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. त्यांची ही अनोखी भेट त्यांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचा प्रतीक ठरत आहे.
रामीनवार हे गेल्या दहा वर्षांपासून माऊलीच्या पालखी सोहळ्यात सातत्याने सेवा बजावत आहेत. पालखी मार्गावरील नातेपुते येथे ते दरवर्षी १५० ते २०० क्विंटल भंडाऱ्याचे आयोजन करतात. यात हजारो वारकऱ्यांसाठी पिठलं, भाकर, कांदा, ठेसा, पाण्याची बॉटल, चहा, बिस्कीट आदींची मनोभावे सोय करतात. भारत रामीनवार हे माऊलीचे एक निष्ठावान भक्त म्हणून ओळखले जातात. भक्ति भावाने प्रेरित होऊन त्यांनी हा सोन्याचा मुकुट मंदिर समितीकडे अर्पण केला असून त्यांच्या या उदात्त कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.