Home »
Kaij » नदी खोलीकरणामुळे साबला गाव पाणीदार ; गाव होणार टँकरमुक्त
नदी खोलीकरणामुळे साबला गाव पाणीदार ; गाव होणार टँकरमुक्त
Updated: नोव्हेंबर 24, 2025
एआरटी संस्थेचा पुढाकार ; जलपूजन उत्साहात
एआरटी संस्थेचा पुढाकार ; जलपूजन उत्साहात
केज – टंचाईच्या काळात टँकरची गरज भासणाऱ्या साबला (ता. केज) या गावात यवतमाळच्या एआरटी या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन गावातून जाणाऱ्या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करीत २० मीटर अंतराचे शोषखड्डे (बॉक्स) तयार केले होते. यंदा पाऊसकाळ मुबलक झाल्याने पाण्याचा साठा झाला असून पाणी आडून जमिनीत मुरल्याने हे गाव पाणीदार झाले आहे. नुकताच जलपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
दरवर्षी उन्हाळ्यात साबला (ता. केज) येथील जलस्रोत कोरडे पडत असल्याने पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ यायची. तर टंचाई निवारणासाठी टँकरशिवाय दुसरा पर्याय नसायचा. टँकरने पाणी पुरवठा करून गावकऱ्यांची तहान भागविली जात होती. गावच्या सरपंच जनाबाई नरहरी काकडे व गावकऱ्यांनी यवतमाळच्या एआरटी संस्थेकडे जलसंधारण वाढीसाठी नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची विनंती केली होती. शेवटी गतवर्षी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुहास धस, मन्सुर खोरासी, जलसंधारण तज्ञ पवन नखाते, प्रकल्प व्यवस्थापक वली तांबोळी, प्रकल्प सहाय्यक ज्योती सांबरे, प्रदिप दहिरे, पोकलेन ऑपरेटर सोनुकुमार चंद्रवंशी, दिलीपकुमार चंद्रवंशी व अक्सिस बँकेचे प्रतिनिधी यांनी साबला येथील नदी पात्राचे दोन हजार मीटर खोलीकरण व रुंदीकरण केले. नदी पात्रात वीस – वीस मीटर अंतराचे शोष खड्डे (बॉक्स) करीत प्रत्येक शोषखड्ड्यात वीस फूट खोल बोरवेल घेण्यात आले. त्यामुळे पावसाचे पडलेले पाणी वाहून न जाता पाणी आडून त्याच ठिकाणी जमिनीमध्ये मुरले आहे. तर मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शिवारातील व परिसरातील बोअर आणि तसेच विहिरींच्या पाणी पातळी वाढीस मदत मिळाली. त्यानंतर पावसाळ्यात झालेल्या मुबलक पावसाने मोठ्या प्रमाणावर नदी पात्रात पाण्याचा साठा झाला असून पाणी ही मोठ्या प्रमाणावर मुरल्याने नदीपासून जवळपास एक ते दिड किलो मीटरपर्यंतच्या बोअर व विहिर पाण्याने भरल्या आहेत. परिणामी, हे गाव पाणीदार झाले असून मागील २० ते २२ वर्षाची टंचाई परिस्थिती यंदा जाणवणार नसून टँकर मुक्त गाव होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे एआरटी संस्था, अक्सिस बँक प्रतिनिधी, सरपंच जनाबाई काकडे, ग्रामपंचायत अधिकारी तानाजी शिंपले यांचे गावकऱ्यांनी आभार मानले.
जलपूजनाचा कार्यक्रम उत्साहात
नदीत साठलेल्या जलसाठ्यामुळे आनंदित झालेल्या ग्रामस्थांनी जलपूजनाचा कार्यक्रम ठेवला होता. एआरटी संस्थेचे पदाधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आले. यावेळी मधुकर काकडे, उत्तम काकडे, ज्ञानेश्वर पांचाळ, समाजसेवक नरहरी काकडे, रामराजे शिंदे, दशरथ कटारे, उमाशंकर शिंदे, हनुमंत कटारे, जगन्नाथ काकडे, लक्ष्मण महाराज काकडे, गणेश कटारे, रंगनाथ नाईकनवरे, उध्दव नाईकनवरे, बाबुराव कटारे, गुलाब मुळे, माऊली नाईकनवरे, राहुल मुळे, लखन राऊत, अंकुश मुळे, भैरू नखाते, सुर्यभान सरवदे, अशोक रोकडे, संदिपान सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गावकऱ्यांसह पशु, पक्षांची पिण्याच्या पाण्याची सोय
नदीत जलसाठा झाल्याने व जमिनीत मुरलेल्या पाण्यामुळे बोअर, विहिरींच्या पाणी पातळी वाढीमुळे उन्हाळ्यात पाणी राहणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह पशु, पक्षांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. शिवाय पिकांच्या उत्पन्न वाढीस ही फायदा होणार आहे.