Breaking
Updated: एप्रिल 1, 2026
अंबाजोगाई तालुक्याला गारपिटीचा तडाखा; उभ्या पिकांची धूळधाण, शेतकरी हवालदिल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील बर्दापूर, उजनी आणि पट्टीवडगाव परिसराला आज बुधवारी सायंकाळी निसर्गाच्या कोपाचा मोठा फटका बसला. सोसाट्याचा वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार गारपिटीने या भागातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान केले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या गर्तेत सापडला आहे.
सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात ढगांची गर्दी झाली आणि काही वेळातच गारांचा पाऊस सुरू झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीला आलेला गहू, ज्वारी आणि हरभरा ही पिके जमिनीदोस्त झाली आहेत. रब्बी पिकांसोबतच आंबा आणि टरबूज यांसारख्या नगदी फळबागांनाही या गारपिटीचा मोठा तडाखा बसला असून फळांची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे. वर्षभर रक्ताचे पाणी करून जोपासलेली पिके डोळ्यादेखत मातीमोल होताना पाहून शेतकऱ्यांनी मोठा हंबरडा फोडला आहे.
या अवकाळी संकटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने आता वर्षभराचा प्रपंच कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे. प्रशासनाने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक ग्रामस्थांकडून दिली जात आहे.