केज : केज शहरातील पान मटेरियलचे दुकान विकत घेतल्याने ते खाली करा म्हणताच; दुकान विकत घेणाऱ्या तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी पाच जणांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, दि. १६ जून रोजी केज शहरातील शुक्रवार पेठ भागात असलेले पान मटेरियल विक्रीचे दुकान निखील अंगद समुद्रे यांनी विशालकुमार दत्तात्रय मस्के यांच्याकडून ८ लाख ८० हजार रुपयाला खरेदी केले आहे.
त्या जागेतील दुकानात या पूर्वी नितीन शाहूराव काळे यांचे पान मटेरियलचे दुकान असल्याने दि. १७ जून रोजी निखिल समुद्रे हा त्याला म्हणाला की, हे दुकान त्याने विकत घेतले असल्याने ते रिकामे करा. असे म्हणताच नितीन काळे यांनी निखिल समुद्रे यास शिवीगाळ करून ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या स्क्रू ड्रायव्हर निखिल समुद्रेच्या दंडावर मारून दुखापत केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्याचा भाऊ दीपक काळे याने सुद्धा मारहाण केली.
त्यानंतर निखिल समुद्रे हा केज पोलिस ठाण्यातून उपचाराचे पत्र घेऊन उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात जात असताना त्याला केज येथील पिसाट्याची नदीवरील पुलावर विक्की श्रीमंतआप्पा लोखंडे, योगेश संजय काळे, संजय जिगांबर काळे या तिघांनी अडवून जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि चापटानी मारहाण केली.
निखिल समुद्रे याच्या फिर्यादीवरून नितीन शाहूराव काळे, दीपक काळे, विक्की श्रीमंतआप्पा लोखंडे, योगेश संजय काळे आणि संजय डिगांबर काळे या पाच जणां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलेश मीना तपास करीत आहेत.