Breaking
Updated: मार्च 30, 2026
डॉ.अजित नवले शेतीप्रश्नी बीडमध्ये
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – पीकविमा, अतिवृष्टी अनुदान, गाळप केलेल्या ऊसाचे देयक आणि अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेले पशुधन नुकसान भरपाई या प्रश्नाला घेत अखिल भारतीय किसान सभा बीड बुधवार दि 1 रोजी कलेक्टर कचेरीवर राज्य सचिव डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ.ऑड.अजय बुरांडे यांनी दिली.
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरिप पीक मोठ्या प्रमाणात वाहून गेले, जमिनी खराडल्या गेल्या या प्रश्नी किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालयावर मोर्चे काढले. या प्रश्नी साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान व रब्बी पिकांसाठी तीन हेक्टर मर्यादे पर्यंत प्रती हेक्टर दहा हजार रुपये अनुदान तर वाहून, खरडून गेलेल्या जमिनीसाठी रोजगार हमीच्या माध्यमातून मदत, पिकविमा धारक शेतकन्यांना झालेल्या पिकाचे नुकसान प्रति हेक्टर किमान साडेसतरा हजार रुपये प्रमाणे पिक विम्यातून देण्याची घोषणा केली.
या सर्व परिस्थितीत वर्ष संपले तरी पिक विमाधारक सर्व शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या प्रमाणात १७५०० रु. पेक्षा जास्त अथवा अतिवृष्टी नुकसानाच धरतीवर घोषित केल्याप्रमाणे किमान १७५०० रुपये सरसकट पिकविमा मिळावा, शासनाने घोषित केलेले अतिवृष्टी अनुदान सर्व वंचित शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत सर्व अडचणींचे निराकरण करून मिळायलाच हवे, मागच्या तीन-चार महिन्यापासून जिल्ह्यातील विविध कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाही ही ऊस बिलाची रक्कम पुढच्या आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मिळणे अजून बाकी आहे. त्यासाठी शासनाने अशा शेतकऱ्यांना घोषित केलेली मदत १० एप्रिल पर्यंत वितरित करावी.या मागण्या घेत जिल्ह्यातील शेतकरी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली बुधवार १ एप्रिल २०२६ रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान सभेचे राज्य सचिव कॉ.डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढणार असून या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन बीड किसान सभेने केले आहे.