Breaking

हिंस्त्र श्वापदाने पाडला सात शेळ्यांचा फडशा; डोंगर पिंपळा परिसरात दहशत

Updated: डिसेंबर 8, 2025

By Vivek Sindhu

हिंस्त्र श्वापदाने पाडला सात शेळ्यांचा फडशा; डोंगर पिंपळा परिसरात दहशत

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा शिवारात एका अज्ञात आणि हिंस्त्र श्वापदाने मोठा हाहाकार माजवला आहे. रविवारी रात्री या श्वापदाने एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून तब्बल सात शेळ्यांना ठार केले. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे १ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असून, परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.

डोंगर पिंपळा येथील शेतकरी बळीराम बाबुराव केंद्रे हे ज्या शेतात वहीत करतात, तिथेच त्यांनी शेळीपालनासाठी शेड उभारले आहे. केंद्रे यांच्याकडे सहा मोठ्या शेळ्या आणि एक लहान पिल्लू असे एकूण सात पशुधन होते. रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता त्यांनी शेळ्यांना चारापाणी केले आणि ते झोपण्यासाठी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हिंस्त्र श्वापदाने त्यांच्या शेडवर हल्ला केला. या हिंस्त्र श्वापदाने गोठ्याच्या संरक्षणासाठी लावलेल्या सहा फूट उंचीच्या जाळीवरून सहज उडी मारून आत प्रवेश केला. आत शिरताच त्याने सातही शेळ्यांना ठार मारून त्यांचा फडशा पाडला. सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर बळीराम केंद्रे यांना धक्का बसला. यामध्ये त्यांचे सुमारे १ लाखांहून अधिक रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने पंचनामा केला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रतन तळेकर आणि डॉ. अभिषेक अबुज यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने या हिंस्त्र श्वापदाचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी डोंगर पिंपळा येथील ग्रामस्थांनी केली आहे.